गणेश विसर्जनाची मिरवणूक रद्द करून धर्मवीर तरुण मंडळ ट्रस्टने दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. मंडळाने दुष्काळामध्ये होरपळणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी २ हजार १०० किलो धान्याची मदत केली आहे.
शहराच्या पूर्व भागात असलेल्या इच्छापूर्ती गणेश अशी ओळख प्रस्थापित झालेल्या धर्मवीर तरुण मंडळ ट्रस्टतर्फे दरवर्षी टिळक रस्त्यावरून विसर्जन मिरवणूक काढली जाते. राज्यातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर यंदा विसर्जन मिरवणूक रद्द करीत मंडळाने शेतकरी बांधवांसाठी धान्य दिले आहे. विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, मंडळाचे युवराज पेटकर, गिरीश भोईटे, श्रीकांत पेटकर, अतुल भिंगारकर या वेळी उपस्थित होते. मंडळाचे यंदा ७६वे वर्ष आहे. पुंडलिक वाघ यांच्या संस्थेला १० हजार रुपयांचा निधी देण्यात आला.
राज्यावर दुष्काळाचे संकट ओढवले असताना विसर्जन मिरवणुकीवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना मदत करणे आवश्यक आहे. ही सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने साधेपणाने विसर्जन करून धान्यवाटप करण्याचे ठरविले. मंडळातर्फे भविष्यातही अशाच प्रकारचे मदतकार्य सुरू ठेवण्यात येणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2015 रोजी प्रकाशित
विसर्जन मिरवणूक रद्द करून दुष्काळग्रस्तांसाठी धान्याची मदत
गणेश विसर्जनाची मिरवणूक रद्द करून धर्मवीर तरुण मंडळ ट्रस्टने दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे.
Written by दिवाकर भावे
First published on: 27-09-2015 at 03:17 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharmaveer tarun mandals help for famine stricken