तेल व नैसर्गिक वायूंची किफायतशीर साठवणूक, आहेत त्या साठय़ांचे संवर्धन आणि त्यांची उत्पादनवाढ यात देशासमोर काही तांत्रिक आव्हाने असल्याचे मत, अमेरिकेतील ‘जेटीआय’ कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी व शेल गॅस उत्पादनातील तज्ज्ञ डॉ. सदानंद जोशी यांनी व्यक्त केले.
एच. के फिरोदिया फाउंडेशनतर्फे दिले जाणारे ‘विज्ञान रत्न’ व ‘विज्ञान भूषण’ पुरस्कार अनुक्रमे बंगळुरूच्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अॅडव्हान्सड स्टडीज’चे संचालक डॉ. बलदेव राज व पुण्याच्या ‘आयसर’ संस्थेचे संचालक डॉ. के. एन गणेश यांना शुक्रवारी प्रदान करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जोशी बोलत होते. डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. गोविंद स्वरुप, अरुण फिरोदिया, जयश्री फिरोदिया या वेळी उपस्थित होते.यातील ‘विज्ञान रत्न’ पुरस्कार २ लाख रुपयांचा, तर ‘विज्ञान भूषण’ पुरस्कार १ लाख रुपयांचा आहे.
भारतात होणारा तेलाचा रोजचा वापर ३.७ दशलक्ष बॅरल एवढा असून त्यातील २.९ दशलक्ष बॅरल तेल आयात केले जाते. दरवर्षी जर हा वापर ७ टक्क्य़ांनी वाढला तर पुढच्या १५ वर्षांत तो दुपटीपेक्षा जास्त होईल, असे सांगून डॉ. जोशी म्हणाले,‘तेल आणि नैसर्गिक वायूच्या बाबतीत आहे त्या साठय़ांचे संवर्धन, अधिक चांगली साठवणूक, उत्पादनातील वाढ आणि पर्यायी ऊर्जेच्या वापरात वाढ हे चार मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत. तेल आणि नैसर्गिक वायूच्या संवर्धनात इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे ‘मायलेज’ वाढवणे व सार्वजनिक वाहतुक सेवेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. सध्या देशात तीन ठिकाणी ३७ दशलक्ष बॅरल तेलसाठा करण्याची सोय उपलब्ध असून आपला ऑगस्टपर्यंतचा प्रत्यक्ष तेलसाठा मात्र ४ दशलक्ष बॅरल एवढाच आहे. आता देशात तेल व नैसर्गिक वायूचे सुरू असलेले उत्पादन वाढवणे आवश्यक असून तेल उत्पादन क्षेत्रांमधून अधिक तेल काढण्यासाठी कमी खर्चिक ‘सरफॅक्टंट’ची (पृष्ठसक्रियकारक साबणसदृश घटक) निर्मिती हे तांत्रिक आव्हान ठरेल. शेल गॅस उत्पादन हा देखील भारतासाठी एक चांगला पर्याय ठरु शकतो.’
डॉ. बलदेव राज यांनी या वेळी अणुऊर्जा उत्पादनाबाबत, तसेच डॉ. के. एन गणेश यांनी जनुकीय औषधनिर्मितीबाबत सादरीकरण केले.