फटाके, फराळ आणि खरेदीचा आनंद लुटत दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते; पण दिवाळीच्या पहिल्या दिवशी सुदूर असलेले आपल्या सीमेवरचे जवान काय करत असतील, असा प्रश्न पुण्यातील एका संस्थेच्या काही कार्यकर्त्यांच्या मनात आला आणि केवळ विचार करून ते थांबले नाहीत, तर जवानांनाही दिवाळीचा आनंद मिळावा यासाठी त्यांनी लगेच उपक्रमही सुरू केला. जवानांची दिवाळी आनंददायी करणारा हा उपक्रम गेली वीस वर्षे अखंडपणे सुरू आहे.
शहरांमध्ये दिवाळीचा आनंद साजरा करताना सीमेवरच्या बांधवांचीही आठवण ठेवणारा हा उपक्रम पुण्यातील ‘स्नेह सेवा’ संस्थतर्फे केला जातो. कुमार बडवे हे या उपक्रमाचे संस्थापक. उदय गडकरी हे आता प्रमुखपणे या उपक्रमाचे काम बघतात. वाघा बॉर्डर, जम्मू बॉर्डर, तवांग बॉर्डर आदी सीमांवर ज्या बटालियन असतात अशा तीन बटालियनमधील सुमारे नऊ हजार जवानांना ‘स्नेह सेवा’तर्फे मिठाई पाठवली जाते. शिवाय ही मिठाई दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जवानांच्या हाती मिळावी, यासाठीही उपक्रमाची तयारी खूप आधीपासूनच केली जाते. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे पुण्यातील शंभर शाळांमधील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतात आणि ते शुभेच्छापत्र तयार करून जवानांसाठी देतात. विद्यार्थ्यांच्या हातून, त्यांच्या कल्पनेतून आणि चित्रकलेतून साकारलेली ही शुभेच्छापत्र आणि प्रत्येक सैनिकाला दिवाळी फराळासह मिठाईचा पुडा असे या दिवाळी भेटीचे स्वरूप असते.
ही मिठाई आणि शुभेच्छा पुण्यातून पाठवण्याचा मोठा कार्यक्रम सैन्य दलातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केला जातो. त्यासाठी खास सीमेवरील काही अधिकारी व जवान दरवर्षी पुण्यात येतात आणि कार्यक्रमानंतर ही भेट मग प्रवास करत सीमेवर पोहोचते. ही सर्व प्रक्रिया करताना अर्थातच ठरलेल्या वेळापत्रकानुसार सर्व कामे करावी लागतात आणि संस्थेचे कार्यकर्ते अशी सर्व कामे आनंदाने करून ठरल्या दिवशी ही भेट पुण्यातून रवाना करतात. या उपक्रमाला साहाय्य करणाऱ्यांची संख्याही दरवर्षी वाढत आहे. शिवाय दरवर्षी नेमाने मदत करणारेही कितीतरी जण आहेत. यंदा ३ नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे.
पुण्यातील जे विद्यार्थी जवानांना शुभेच्छापत्र पाठवतात, त्यातील अनेक विद्यार्थ्यांना सीमेवरील जवानांकडून उत्तरही येते. जवानांकडून कृतज्ञता व्यक्त करणारी अशी जी पत्र येतात तो अनुभव विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरतो.
महेंद्र शेंडे, सचिव, स्नेह सेवा
