ज्ञानप्रबोधिनी शाळेला यावर्षीही प्रवेश करण्यासाठी न्यायालयाकडे धाव घ्यावी लागली आहे. पाचवीचे प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून केल्यामुळे गेल्यावर्षीपासून शाळा वादात अडकली आहे.
ज्ञानप्रबोधिनी शाळेचे पाचवीचे प्रवेश हे प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्यावर शिक्षण हक्क कायद्याचा भंग होत असल्याची तक्रार सिस्कॉम या संस्थेने केली होती. त्या तक्रारीची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी गेल्यावर्षी शाळेची प्रवेश प्रक्रिया रद्द ठरवली होती. त्यावर शाळेने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने शिक्षणाधिकाऱ्यांच्या निर्णयाला एक वर्षांची स्थगिती दिली होती. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी गेल्यावर्षीचे प्रवेश न्यायालयाने वैध ठरवले होते. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्याचा अंतिम निकाल अद्यापही लागलेला नाही. न्यायालयाने गेल्यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेलाच परवानगी दिल्यामुळे यावर्षी पुन्हा प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी शाळेला न्यायालयाकडे धाव घ्यावी लागली आहे.