आघारकर संशोधन संस्थेतील संशोधकांचे संशोधन

पुणे : औषध निर्मितीमध्ये महत्त्व असलेल्या वनस्पतींच्या औषधी भागाचे चित्रमय दस्तऐवजीकरण आघारकर संशोधन संस्थेतील संशोधकांनी केले आहे. या अंतर्गत राज्यभरातील १७४ औषधी वनस्पतीच्या प्रजातींमधील १९८ भागांची छायाचित्रे आणि माहिती संकलित करून त्याचे ‘कॉम्पेन्डियम ऑफ रॉ बॉटनिकल ड्रग्ज ऑफ महाराष्ट्र’ हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आघारकर संशोधन संस्थेतील डॉ. अनुराधा उपाध्ये आणि डॉ. मंदार दातार यांनी  हे संशोधन केले आहे. या पुस्तकासाठी पाच वर्षे राज्यभरात फिरून वनस्पतींची छायाचित्रे, माहिती आणि नमुने संकलित करण्यात आले. तसेच हे नमुने आघारकर संशोधन संस्थेमध्ये शास्त्रीय पद्धतीने जतन करण्यात आले आहेत. या कामासाठी मुंबईच्या राजीव गांधी सायन्स अँड टेक्नोलॉजी कमिशनने निधी उपलब्ध करून दिला. औषधी वनस्पतींचा औषधांमध्ये वापरला जाणारा भाग दिसतो कसा हे उद्दिष्ट ठेवून संकलन केले आहे. आयुर्वेदात रुची असणारे, वैद्यकशास्त्रातील अभ्यासक, उद्योजक, औषधनिर्माणशास्त्राचे विद्यार्थी यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. डॉ. मंदार दातार म्हणाले, की राज्यभरातील वनस्पतींच्या औषधी भागांचे आतापर्यंत चित्रमय स्वरुपात दस्तऐवजीकरण उपलब्ध नव्हते. औषधी वनस्पती माहीत नसतात किंवा विशेषत: त्या दिसतात कशा हे अनेकदा कळत नाही. त्यामुळे काहीवेळा औषधांच्या वनस्पतींची भेसळ किंवा दुसऱ्याच वनस्पती वापरून फसवणुकीचे प्रकार होतात. ती उणीव दूर करण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे.

या पूर्वी वेगवेगळ्या राज्यांतील औषधी वनस्पतींचे सर्वेक्षण केले होते. तर आता राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील औषधी वनस्पतींमधील बारकावे आणि फिजिकल कॉन्स्टन्ट दाखवले गेले आहेत. त्यामुळे राज्यातील उच्च औषधीमूल्य असलेल्या वनौषधींच्या मानकांचे निश्चितीकरण झाले आहे. लोक वापरत असलेल्या वनौषधींची ओळखखूण दाखवणे, वनस्पतींमध्ये होणारे बदल दाखवण्याचा या अभ्यासाचा प्रयत्न होता. असे संशोधन देशपातळीवर करायला हवे. जेणेकरून पारंपरिक वनौषधींची सर्वसमावेशक माहिती संग्रहित होऊ शकेल. औषधी वनस्पती, त्यांचे गुणधर्म आणि पृथक्करण या संदर्भात आणखी संशोधनही करणे शक्य आहे. त्यासाठी औषध निर्मिती कंपन्यांनी पुढे यायला हवे.

– डॉ. अनुराधा उपाध्ये, संशोधक

विनामूल्य डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध

‘कॉम्पेन्डियम ऑफ रॉ बॉटनिकल ड्रग्ज ऑफ महाराष्ट्र’ आणि या पूर्वीचे ‘फॉरेस्ट फूड्स ऑफ नॉर्दन वेस्टर्न घाट’ ही दोन पुस्तके  आघारकर संशोधन संस्थेच्या संकेतस्थळावरून ई बुक स्वरुपात विनामूल्य डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.