‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देत व्हीलचेअरवर असलेल्या प्रत्येक जवानाला औक्षण करण्यात आले. देशासाठी लढताना आलेल्या अपंगत्वावर मात करणाऱ्या या सैनिकांना जगण्याची लढाई समर्थपणे लढण्यासाठीचे बळ देणारा भाऊबीजेचा सोहळा रविवारी साजरा करण्यात आला.
साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि सैनिक मित्र परिवार यांच्यातर्फे खडकी येथील अपंग पुनर्वसन केंद्रातील जवानांसाठी भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वीणा देव यांनी जवानांना औक्षण करून त्यांच्याशी संवाद साधला. केंद्राचे प्रमुख कर्नल डॉ. पी. आर. मुखर्जी, मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा, सैनिक मित्र परिवारचे अध्यक्ष अशोक मेहेंदळे, आनंद सराफ, दिलीप गिरमकर, गिरीश सरदेशपांडे, अमित दासानी, अमर हिरेशिखर, सुनील फाटक, अरिवद पारखी, संकेत निंबाळकर, मीनाक्षी दुसाने, स्वाती ओतारी, रेणुका शर्मा, गंधाली शहा, विद्या घाणेकर, निराली लातूरकर, स्वाती रजपूत या वेळी उपस्थित होते.
वीणा देव म्हणाल्या,‘आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दु:खं असतात. परंतु, आपले सैनिक देशाच्या आणि आपल्या रक्षणासाठी जो असीम त्याग करतात त्या तुलनेत आपल्या दु:खाचे मोल काहीच नाही. देशाच्या सीमेवर अहोरात्र आपले रक्षण करणाऱ्या सैनिकांकडे पाहूनच आपले मनोबल वाढत असते.’
डॉ. मुखर्जी म्हणाले,‘अपंगत्व आल्यानंतर सैनिकांचे पुढील आयुष्य खडतर असते. त्यामुळे सैनिकांसमवेत सण-उत्सव साजरे केल्याने त्यांचे मनोबल वाढते. अपंगत्व आले तरी प्रत्येक सैनिकामधील सकारात्मकता मोठी असते. कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जाणारे सैनिकच नाही, तर प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात योगदान देत देशसेवाच करीत असतो.’
आमच्या कुटुंबीयांसमवेत भाऊबीज साजरी केल्याचा आनंद आज मिळाला. अपंगत्व आले असले तरी जगण्याची आणि लढण्याची जिद्द कायम आहे, अशी भावना अपंग सैनिक भोपालनाथ चौधरी यांनी व्यक्त केली. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr veena devs dialogue with handicapped soldiers