पुणे : दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात घाऊक आणि किरकोळ बाजारात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो खाद्यतेलाच्या दरात दहा रुपयांनी वाढ झाली आहे. दिवाळीत खाद्यतेलांना मागणी वाढल्याने खाद्यतेलांच्या दरात तेजी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळीत खाद्यतेलांच्या मागणीत मोठी वाढ होते. मागणीच्या तुलनेत खाद्यतेलांची आवक कमी झाल्याने घाऊक बाजारात खाद्यतेलाच्या  १५ किलो डब्यांच्या दरात १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वी हे दर स्थिर होते.

सूर्यफूल तेलाच्या १५ किलो डब्याच्या दरात  ५०० ते ७०० रुपयांनी घट झाली होती. रशियाने युक्रेनवर पुन्हा हल्ले सुरू केल्यानंतर युक्रेनमधून होणारी सूर्यफूल तेलाची आवक गेल्या काही दिवसांपासून थांबली आहे. त्यामुळे सूर्यफूल तेलाच्या डब्यामागे १५० ते २०० रुपयांनी वाढ झाली असल्याचे मार्केट यार्डातील खाद्यतेल व्यापारी, चिमणलाल गोिवददास पेढीचे भागीदार कन्हैयालाल गुजराथी यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून फराळाचे पदार्थ मिठाई विक्री दुकानातून खरेदी करण्याचा कल वाढला आहे. दिवाळीत  खाद्यतेलांच्या मागणीत  वाढ होते. मागणीच्या तुलनेत खाद्यतेलांच्या पुरवठा कमी झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात खाद्यतेलांच्या दरात वाढ झाली असल्याचे निरीक्षक गुजराथी यांनी नोंदविले.

घाऊक बाजारात सोयाबीनच्या १५ किलो डब्यामागे १०० रुपयांनी वाढ झाली आहे. सरकी तेलाच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली असून शेंगदाणा तेलाचे दर स्थिर आहेत. पाम तेलाचे दरही वाढले आहेत. वनस्पती तुपाच्या दरात किलोमागे ५० रुपयांनी वाढ झाली आहे.

युक्रेनमधून सूर्यफूल तेलाची आवक बंद .. युक्रेनवर रशियाने पुन्हा हल्ले सुरू केले आहेत. भारतात सूर्यफुलाची आवक युक्रेनमधून होते. युक्रेनमधून होणाऱ्या सूर्यफूल तेलाची आवक बंद झाली आहे. त्यामुळे  काही दिवसांत सूर्यफूल तेलाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. देशात ८० लाख टन खाद्यतेलाची निर्मिती केली जाते. देशाची एकूण गरज १६० लाख टनांपेक्षा जास्त आहे. परदेशातून सोयाबीन, पामतेल तसेच सूर्यफूल तेल आयात करावे लागते. परदेशातील खाद्यतेलांच्या आयातीवर भारताला अवलंबून राहावे लागत असल्याची माहिती खाद्यतेल व्यापाऱ्यांनी दिली.

परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान..

परतीच्या पावसामुळे सोयाबीन, कापसासह सर्व शेतीमालाचे नुकसान झाले आहे. मराठवाडय़ात सोयाबीनची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. सोयाबीनचे नुकसान झाल्याने तेलनिर्मितीवर परिणाम होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Edible oil price increase by rs 10 zws