पुणे : जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, इंधन दरवाढीमुळे सामान्य होरपळलेले असताना खाद्यतेलाच्या दरात गेल्या महिन्याभरात मोठी घट झाली. खाद्यतेलांच्या १५ किलोच्या डब्यामागे २०० ते ३०० रुपयांनी घट झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो तेलाच्या पिशवीमागे २० ते ३० रुपयांनी घट झाल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्यप्प्प्याने वाढ होत गेली. रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे सूर्यफूल तेलाची आवक कमी झाली. त्यानंतर इंडोनेशिया, मलेशियात पामतेलाचे उत्पादन कमी झाल्याने तेथील स्थानिक बाजारात पामतेलाचा तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे त्या देशांनी पामतेल निर्यातीवर निर्बंध घातले. त्याचाच परिणाम म्हणून  भारतात तेलाचे दर वाढले. दक्षिण अमेरिकेतील देशांतील हवामान बदलामुळे सोयाबीनची लागवड कमी झाल्याने भारतात सोयाबीन तेलाचा पुरवठा कमी प्रमाणावर होत होता. जागतिक बाजारपेठेतील या घडामोडींमुळे पामतेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेलाच्या दरात मोठी वाढ झाली होती.

जागतिक बाजारपेठेतून गेल्या महिन्याभरापासून खाद्यतेलांचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर सूर्यफूल, सोयाबीन, पामतेलाच्या दरात घट झाली आहे. शेंगदाणा तेलाचे दर टिकून आहेत. मार्केट यार्डातील घाऊक भुसार बाजारात दररोज १०० टन तेलाची आवक सध्या होत आहे.

‘‘खाद्यतेलाचे दर जागतिक बाजारपेठेतील घडामोडींवर अवलंबून आहेत. गेल्या महिनाभरात खाद्यतेलाच्या दरात घट झाली’’, असे मार्केट यार्डातील खाद्यतेल व्यापाऱ्यांनी सांगितले.

खाद्यतेलाचे दर (प्रति १५ किलो, रुपयांत)

तेलाचा प्रकार       जून महिन्यातील दर        आताचे दर

पाम तेल    २२०० ते २२५०             २००० 

सूर्यफूल २६००                     २४०० ते २५००

सोयाबीन    २३०० ते २३५०          २२०० 

जागतिक बाजारपेठेतील घडामोडींवर खाद्यतेलाचे दर अवलंबून असतात. खाद्यतेलांचा पुरवठा सुरळीत झाला आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात खाद्यतेलांच्या दरात घट झाल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

– रायकुमार नहार, खाद्यतेल व्यापारी, मार्केट यार्ड