शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा अद्यापही दिलेला नसल्यामुळे त्यांच्यावर आता अविश्वास ठराव दाखल करण्यात येणार आहे. अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली नोटीस शिक्षण मंडळातील भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी धुमाळ आणि रवी चौधरी यांना शनिवारी दिली.
भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील गटनेता गणेश बीडकर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. भाजपचे शिक्षण मंडळ सदस्य रघु गौडा, किरण कांबळे आणि मंजूश्री खर्डेकर यांनी ही नोटीस दिली आहे. एका शिक्षकाच्या बदलीसाठी लाच घेतल्याच्या प्रकरणात धुमाळ आणि शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य रवी चौधरी यांच्यावर कारवाई झाली असून दोघांनाही राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून तात्पुरते निलंबित केले आहे. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी मंडळातील पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आणि शिवसेनेने केली होती. मात्र दोघांनी मंडळातील पदाचा राजीनामा दिलेला नसल्यामुळे त्यांना भाजपतर्फे नोटीस देण्यात आली आहे. शिक्षण मंडळ सदस्यांची विशेष सभा तातडीने बोलवावी अशीही मागणी भाजपने केली असून आपल्यावर अविश्वास ठराव का आणू नये, याचा खुलासा तातडीने करावा असे धुमाळ आणि चौधरी यांना देण्यात आलेल्या नोटिशीत म्हटले आहे.
अविश्वासाचा ठराव मांडण्याअगोदर संबंधितांना दोन आठवडे आधी नोटीस देणे बंधनकारक आहे. त्यानुसार धुमाळ आणि चौधरी यांना म्हणणे मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे, असे गौडा यांनी सांगितले.
मंडळाचे अध्यक्ष धुमाळ आणि सदस्य चौधरी यांना पक्षाने तात्पुरते निलंबित केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिक्षण मंडळातील सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणे अपेक्षित आहे. मंडळाच्या सभेत राष्ट्रवादीचे सदस्य कोणती भूमिका घेणार हे आता महत्त्वाचे आहे, असे बीडकर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jul 2015 रोजी प्रकाशित
शिक्षण मंडळ अध्यक्षांना अविश्वास ठरावाची नोटीस
शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा अद्यापही दिलेला नसल्यामुळे अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली नोटीस त्यांना शनिवारी दिली.
First published on: 05-07-2015 at 02:57 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education board chairman no confidence motion notice