‘बालभारती’च्या अभ्यासक्रमातील गंभीर प्रकार :- महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) तयार केलेल्या अकरावीच्या जीवशास्त्र विषयाच्या इंग्रजी पुस्तकात असंख्य चुका असल्याचे समोर आले आहे. या चुका निदर्शनास आणून देणारी दोन पत्रे पाठवल्यानंतर बालभारतीने दखल घेऊन ‘सरकारी’ प्रतिसाद दिला असला, तरी करिअरचा पाया ठरणाऱ्या अकरावीच्या वर्षांतच विद्यार्थ्यांवर चुकीचे शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.

डॉ. हेमलता साने यांनी या पुस्तकातील चुका दाखवून दिल्या आहेत. डॉ. साने गरवारे महाविद्यालयातून वनस्पतिशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या आहेत. जीवशास्त्राचे पुस्तक चाळताना त्यांना या पुस्तकात चुका असल्याचे आढळून आले. जीवशास्त्र आणि वनस्पतिशास्त्राशी संबंधित असलेल्या १, २, ३, ५, ६, ७, ८, ९, १२ आणि १३ या प्रकरणांतील या चुका समोर आल्या आहेत.

पुस्तकातील पाननिहाय चुकांचा सविस्तर अहवाल तयार करून डॉ. साने यांनी २ ऑक्टोबरला तो बालभारतीला पाठवून तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली. मात्र त्याला बालभारतीकडून काहीच प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यानंतर पुन्हा १ नोव्हेंबरला त्यांनी स्मरणपत्र पाठवल्यावर ‘सरकारी’ प्रतिसाद मिळाला. ‘जीवशास्त्र समिती सभेपुढे पत्र अवलोकनार्थ आणि विचारार्थ ठेवण्यात आले आहे. त्याबाबतचा निर्णय आपणास कळवण्यात येईल,’ असे पत्र बालभारतीकडून देण्यात आले आहे.

डॉ. साने यांनी या प्रकाराची माहिती ‘लोकसत्ता’ला दिली. ‘केवळ उत्सुकतेचा भाग म्हणून अकरावीचे जीवशास्त्राचे इंग्रजी पुस्तक  चाळले असता त्यात असंख्य  चुका आढळून आल्या. त्यात चुकीची माहिती देण्यात आल्याचे दिसून आले. मूलभूत व्याकरणाच्या चुकांपासून विज्ञानातील तपशिलाच्याही चुका आहेत. अभ्यासक्रमात वापरण्यापूर्वी या पुस्तकांची काटेकोर पद्धतीने तपासणी होते की नाही, असा प्रश्न हे पुस्तक वाचून पडला. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना चुका असलेल्या पुस्तकाचा अभ्यास करावा लागत आहे. पुस्तकातील चुका एका सविस्तर अहवालाद्वारे बालभारतीकडे दिल्या. त्यासाठी दोन पत्रे पाठवल्यानंतर बालभारतीने उत्तर दिले. त्यामुळे बालभारती या चुकांबाबत गंभीर आहे की नाही, असे वाटते. या पुस्तकात तातडीने बदल न केल्यास या चुकांची पुनरावृत्ती बारावीच्या पुस्तकातही होण्याचा धोका नाकारता येत नाही,’ असे डॉ. साने यांनी सांगितले.

झाले काय?

पुस्तकात काही ठिकाणी चुकीच्या शब्दांचा वापर, काही ठिकाणी व्याकरणाच्या चुका, तर काही ठिकाणी चुकीची वैज्ञानिक माहिती असे या चुकांचे स्वरूप आहे. मात्र त्यामुळे अर्थाचा अनर्थ होत आहे. उदाहरणार्थ, पेशींच्या संदर्भात मॅन्युफॅक्चर म्हणजे उत्पादन असा शब्द वापरला गेला आहे. ‘लाइट इज अ‍ॅब्सॉर्ब बाय वेव्हलेंग्थ सच स्पेक्ट्रम कॉल्ड अ‍ॅज अ‍ॅब्सॉर्बशन स्पेक्ट्रम’ ही चुकीची वैज्ञानिक माहिती देण्यात आली आहे. लायकेन अर्थात दगडफूल ही पेशी असलेली प्रजाती ‘पेशी नसलेल्या’ गटात नमूद करण्यात आली आहे.

तज्ज्ञांचा समावेश असलेल्या अभ्यास मंडळासमोर हा विषय मांडण्यात आला आहे. पुस्तकातील संदर्भ तपासून घेतले जातील. त्यावर अभ्यास मंडळाकडून म्हणणे मांडले जाईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. – विवेक गोसावी, संचालक, बालभारती