पुण्याच्या मावळमध्ये बैलगाडा मालकाचे अपहरण करून ५० लाखांच्या खंडणीसाठी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने आरोपींना अटक केली आहे. पंडित जाधव अस अपहरण करून हत्या करण्यात आलेल्या बैलगाडा मालकाचे नाव आहे. घटनेप्रकरणी मुख्य आरोपी सुरज वानखेडे याला अटक करण्यात आली आहे. हत्येच्या कटात सहभागी असलेला आरोपी रणजीत कुमार हा फरार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेले पंडित जाधव यांच्याकडे आरोपी सुरज वानखेडे हा भाडेकरू म्हणून राहत होता. त्यांचे अनेक छोटे- मोठे व्यवहार तो पाहायचा. अगदी त्यांचा मोबाईल देखील सुरज हाताळत होता. यामुळे पंडित जाधव यांच्याकडे पैसे किती आहेत. त्याचा अंदाज त्याला आला होता. त्यांच्या घराचं बांधकाम देखील सुरज आणि त्याच्या वडिलांनी केलं होतं. १४ नोव्हेंबर रोजी सुरज वानखेडेने पंडित जाधव यांना फोन करून बोलून घेतलं आणि मित्र रणजीत कुमारच्या मदतीने अपहरण केलं. सुरजला पंडित जाधव यांच्या मोबाईलचा पासवर्ड माहित होता. त्याने त्यांच्या पत्नीकडे ५० लाखाच्या खंडणीची मागणी केली. याबाबत पोलिसांना काही माहिती दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सुरज, हत्या झालेल्या पंडित जाधव यांच्या मोबाईलचा वापर करून त्यांच्या घरच्यांना धमकावत होता. तोपर्यंत पंडित यांची दोरीने गळा आवळून हत्या केली होती. अखेर जाधव कुटुंब पोलिसांकडे गेलं आणि त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला. तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर आणि सीसीटीव्ही फुटेच्या आधारे खंडणी विरोधी पथकाने सुरज वानखेडे याला अटक केली.

हेही वाचा – हडपसरमध्ये चालणार ‘एम’ फॅक्टर ! बंडखोर उमेदवाराच्या मतांंवर विजयाचा कौल

हेही वाचा – वाढीव मतदानाचा ‘लाभार्थी’ कोण?

मृतदेहाची अशी लावली विल्हेवाट

सुरज वानखेडे याने पंडित यांची दोरीच्या साह्याने गळा आवळून हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पंडित जाधव यांच्या घरातील व्यक्तींना व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करून त्यांची चारचाकी गाडी बोलून घेतली. ती गाडी घेऊन पंडित जाधव यांचा मृतदेह त्या गाडीत ठेवला. एक दिवस मृतदेह गाडीतच होता. अखेर मृतदेह जाळण्याचे ठरवल्यानंतर जाधववाडी परिसरातीलच काही अंतरावर डोंगराच्या जवळ त्यांचा मृतदेह जाळण्यात आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मृतदेह जळाला आहे का? हे पाहण्यासाठी सुरज घटनास्थळी पोहोचला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous bullock cart owner murder in maval for ransom of 50 lakhs what exactly is the case kjp 91 ssb