राज्याचे माजी राज्यमंत्री धर्मराजबाबा अत्राम यांच्यावर हरीण शिकार प्रकरणी सासवड न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या तारखांना सतत गैरहजर राहून खटला लांबवत असल्यामुळे न्यायालयाने त्यांना मंगळवारी फटकारले. यापुढे खटल्याच्या तारखांना आरोपींनी वकिलांसोबत हजर न राहिल्यास गैरहजेरीमध्ये काम चालविले जाईल, असे सुनावले.
पुरंदर तालुक्यातील संगमेश्वर परिसरातील डोंगरावर २६ जून २००६ रोजी हरिणांची शिकार करण्यात आली होती. या वेळी अत्राम यांनी लाल दिव्याच्या मोटारीतून येऊन आपल्या तीस साथीदारांसह हरणांची शिकार केली होती. या प्रकरणी वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी आठ जणांस पकडले होते. या प्रकरणी सासवड न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्यास अतिरिक्त सरकारी वकील रमेश घोरपडे हे काम पाहत आहेत.
या घटनेला पाच वर्ष होत आली तरी खटल्याचे कोणतेच कामकाज होत नव्हते. तारखांना कधी आरोपी तर कधी वकील उपस्थित न राहणे, विनंतीअर्ज करणे, अशी वेगवेगळी कारणे सांगून खटला लांबत होता. मंगळवारी या खटल्याची तारीख होती. त्याला अत्राम यांच्यासह सर्व आरोपी हजर होते. पण, चार आरोपींचे वकील अनुपस्थितीत होते. त्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. पंडागळे यांनी आरोपी व त्याचे वकील गैरहजर राहिल्याबाबत नापसंती व्यक्त केली. विविध कारणे देऊन पाच वर्षे खटला लांबविल्यामुळे अत्राम यांच्यासह इतर आरोपींना फैलावर घेतले. यापुढे तारखांना उपस्थित न राहिल्यास तुमच्या अनुपस्थितीत कामकाज पुढे चालविले जाईल, असे सुनावले. या खटल्याची पुढील तारीख वीस जुलै ठेवण्यात आली आहे, अशी माहिती घोरपडे यांनी दिली.