वीज तोडण्याच्या बनावट ‘एसएमएस’द्वारे  फसवणुकीचे प्रकार

वीज तोडण्याचा संदेश वेगवेगळय़ा वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून पाठविण्यात येत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरील ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नका

पुणे : ‘गेल्या महिन्याचे वीजबिल भरले नसल्याने आपला वीजपुरवठा रात्री साडेनऊला तोडण्यात येणार आहे. त्यामुळे सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा..’ अशा स्वरूपाचे बनावट ‘एसएमएस’ वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून पाठवून, तसेच एखादी लिंक किंवा प्रणाली उघडण्यास सांगून वीज ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार शहरात घडत आहेत. महावितरण कंपनीकडून अशा प्रकारे वैयक्तिक क्रमांकावरून कोणालाही ‘एसएमएस’ पाठविले जात नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी या ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीज तोडण्याचा संदेश वेगवेगळय़ा वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून पाठविण्यात येत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या संदेशानंतर ऑनलाइन वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून बनावट लिंक पाठविण्यात येत आहे. तसेच ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी संगणक प्रणाली डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. ग्राहकांनी त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाइल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील शिल्लक रक्कम लंपास करण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी असे बनावट संदेश व लिंककडे संपूर्णपणे दुर्लक्ष करावे, असे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.

पुण्यातील एका ग्राहकाला २३ मे रोजी असाच बनावट ‘एसएमएस’ पाठवून ऑनलाइनद्वारे २२ हजार रुपये लुबाडल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित ग्राहकाने शिवाजीनगर येथील सायबर सेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यासोबतच महावितरणकडूनही बनावट ‘एसएमएस’प्रकरणी सायबर सेलमध्ये यापूर्वीच तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

महावितरणचा एसएमएसकसा येतो?

महावितरणकडून मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच ‘एसएमएस’द्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी कळविला जातो. मीटर वाचन घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहितीही ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येते. मात्र, हे ‘एसएमएस’ पाठविण्याचा  सेंडर आयडी (Sender ID) हा ‘एमएसईडीसीएल’ (MSEDCL) (उदा.  VM- MSEDCL,  VK- MSEDCL) असा आहे. तसेच, या अधिकृत संदेशातून वीजग्राहकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क करण्याबाबत कळविले जात नाही.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fraud after sending fake sms regarding power disconnection zws

Next Story
निवडणुका येताच ‘रेड झोन’चा प्रश्न ऐरणीवर ; वर्षांनुवर्षे लाखो नागरिकांवर टांगती तलवार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी