बनावट जात प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढविल्याच्या प्रकरणी पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका संध्या सूरदास गायकवाड यांच्यावर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पद्मिनी राजे मोहिते (वय ४५, रा. अग्रसेन हौसिंग सोसायटी, फुगेवाडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात गायकवाड यांच्यासह त्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी व निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मदत करणाऱ्या सर्वाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१२ मधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ‘६२ अ’ मधून गायकवाड यांनी निवडणूक लढविली होती. ही जागा ओबीसी प्रवर्गातील महिलासांठी राखीव होती. निवडणूक लढविण्यासाठी निवडणूक नामनिर्देश कार्यालयामध्ये भरून दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी खोटी माहिती दिली. त्याचप्रमाणे जातीचा बनावट प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रही तयार करून घेतले. खोटी कागदपत्रे सादर करून मिळविलेल्या जातीच्या प्रमाणपत्रावर त्यांनी निवडणूक लढविली व त्या विजयी झाल्या. मात्र, हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे नंतर उघड झाले. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी मोहिते यांनी गायकवाड यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली होती.