सुटय़ा पैशांवरून होणारे वाद टाळण्यासाठी तसेच दरांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी पीएमपीच्या तिकीटदरांची फेररचना करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. पीएमपीचा तिकीटदर यापुढे पाच ते पस्तीस रुपये असा पाच रुपयांच्या टप्प्यात असेल. या निर्णयाची अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून होण्याची शक्यता आहे.
पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी बोलावण्यात आली होती. या बैठकीतील निर्णयाची माहिती संचालक, नगरसेवक प्रशांत जगताप यांनी दिली. सुटय़ा पैशांवरून होणारे वाद तसेच काही टप्प्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जादा दर द्यावा लागत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे जगताप यांनी सांगितले. मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार पीएमपीचे किमान तिकीट पाच, तर कमाल तिकीट पस्तीस रुपये असेल.
दर आकारणी करताना जवळच्या पाच रुपयांच्या टप्प्यानुसार तिकीटदर आकारला जाईल. आठ वा नऊ रुपयांचे तिकीट यापुढे दहा रुपयांना, तर अकरा वा बारा रुपयांचे तिकीट दहा रुपयांना मिळेल. तसेच जेथे तेरा वा चौदा रुपये असा तिकीट दर होता, त्या प्रवासासाठी आता पंधरा रुपये द्यावे लागतील. सोळा वा सतरा रुपयांचे तिकीट आता पंधरा रुपयांना, तर अठरा वा एकोणीस रुपयांचे तिकीट वीस रुपयांना दिले जाईल. याप्रमाणे पस्तीस रुपयांपर्यंतच्या तिकिटांचे दर बदलण्यात येणार आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर ही दरवाढ अमलात येईल, अशीही माहिती जगताप यांनी दिली.
पीएमपीच्या अधिकाऱ्यांसाठी पदनिर्मितीचा जो आराखडा तयार करण्यात आला होता त्यालाही संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच संगणक व अन्य काही विभागांची कामे तज्ज्ञ व कुशल कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यासाठी ही कामे खासगी कंपन्यांकडून करून घेण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.
‘पाच रुपयांची कुपन काढा’
पीएमपीने घेतलेला निर्णय चांगला असून प्रवाशांच्या सोयीसाठी आता पीएमपीने पाच रुपयांची कुपन प्रवाशांना उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी यांनी केली आहे. कुपन बरोबर असल्यास प्रवाशांना गरजेनुसार त्यांचा वापर करता येईल, तसेच नियमितपणे प्रवास करणारे प्रवासी ठोक स्वरुपातही कुपन खरेदी करतील, याकडे राठी यांनी लक्ष वेधले आहे.