एफटीआयआयचा तिढा सोडवावा या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या अलोक अरोरा या विद्यार्थ्यांला प्रकृती अस्वास्थ्यामुळे शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
एफटीआयआय सोसायटीचे अध्यक्ष गजेंद्र चौहान आणि इतर चार सदस्य अनघा घैसास, राहुल सोलापूरकर, नरेंद्र पाठक, शैलेश गुप्ता यांना हटवण्याच्या मागणीचे आंदोलन तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू आहे. हा तिढा सोडवावा या मागणीसाठी गेल्या गुरूवारी दुपारपासून एफटीआयआयचे तीन विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. त्यापैकी एकाला शुक्रवारी त्रास झाला. त्यामुळे त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्याऐवजी आणखी एक विद्यार्थी उपोषणाला बसला. आता या तिघांपैकी अलोक अरोरा याची प्रकृती शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बिघडली. त्यामुळे एफटीआयआय प्रशासनाने त्याला उपोषण सोडण्याचा आग्रह केला. मात्र, त्याने तो मानला नाही. मग त्याला जोशी रुग्णालयात नेण्यात आले. त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. तो मूळचा दिल्लीचा आहे.