ढोलांचा दणदणाट, ताशांचा कडकडाट, रांगोळ्यांचे बहुरंगी गालिचे, पायघडय़ा, फुलांचे प्रेक्षणीय रथ, ‘मोरया, मोरया’चा गजर आणि रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले हजारो भाविक.. अशा वातावरणात निघालेली पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची पारंपरिक आणि शाही थाटातील मिरवणूक यंदाही लक्षणीय ठरली. मानाच्या पाचही मंडळांनी मूर्तीचे विसर्जन महापालिकेने व्यवस्था केलेल्या हौदांमध्ये करून यंदा नवा पायंडा पाडला.
पुण्याच्या गणेशोत्सवाचे आकर्षण ठरणाऱ्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ रविवारी सकाळी साडेदहा वाजता झाला. महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते कसबा गणपतीच्या ‘श्रीं’ची आरती मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ करण्यात आली आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, उपमहापौर आबा बागूल, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह आमदार, नगरसेवक व राजकीय नेतेमंडळी यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होती. मंडई, बेलबाग चौकमार्गे ही मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावर आली तेव्हा ही दिमाखदार मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मानाच्या गणपतींचे दर्शन  घेण्यासाठीही भाविक रस्त्याच्या कडेने उभे होते. मिरवणुकीत सहभागी झालेल्या ढोल-ताशा पथकांकडून वाटेत अनेक ठिकाणी थांबून विविध तालांचे वादन केले जात होते आणि नागरिक त्यावर ठेका धरत होते. वादक युवक-युवतींच्या उत्साहामुळे तसेच त्यांच्या पारंपरिक वेशभूषेमुळे मिरवणूक प्रेक्षणीय ठरली. ढोल-ताशांबरोबरच मल्लखांब तसेच विविध क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिकेही मिरवणुकीत सादर केली जात होती.
यंदाचा दुष्काळ लक्षात घेऊन मानाच्या मंडळांनी मूर्तीचे विसर्जन महापालिकेने तयार केलेल्या हौदांमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मानाच्या पाचही मंडळांनी मूर्तीचे विसर्जन नटेश्वर घाट येथे केले. या ठिकाणी या मंडळांसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती.
मिरवणुकीच्या स्वागतासाठी राष्ट्रीय कला अकादमीचे दोनशे कलाकार बेलबाग चौकापासून ते टिळक चौकापर्यंत रांगोळ्या काढत येत होते. त्यांची कला पाहण्यासाठीही ठिकठिकाणी गर्दी होत होती. रस्त्याच्या मध्यातून रांगोळीच्या पायघडय़ा तर मुख्य चौकांमध्ये रांगोळ्यांचे भव्य गालिचे घातले जात होते. या गालिचांमध्ये रंग भरण्याचे कामही मोठय़ा कौशल्याने केले जात होते. विविध सामाजिक संदेशही या रंगावलीच्या माध्यमातून दिले जात होते.
श्री कसबा गणपती
मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची मिरवणूक प्रथेप्रमाणे पालखीतून काढण्यात आली. प्रभात बँडबरोबरच, रमणबाग, शिववर्धन यांची पथके या मिरवणुकीत होती. तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने या मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
आढाव बंधूंचे नगारावादन, ताल, शिवमुद्रा पथके, मराठी चित्रपट आणि मालिकांमधील कलावंतांचे पथक, न्यू गंधर्व बँड या क्रमाने श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या ‘श्रीं’ची मिरवणूक काढण्यात आली. या मानाच्या दुसऱ्या गणपतीची मिरवणूक फुलांनी सजवलेल्या चांदीच्या पालखीतून काढण्यात आली. मंडळाच्या महिला व युवती तसेच युवक कार्यकर्ते पारंपरिक वेषभूषेत सहभागी झाले होते.
श्री गुरुजी तालीम मंडळ
मानाच्या तिसऱ्या श्री गुरुजी तालीम मंडळाने मिरवणुकीत फुलांचा भव्य रथ आणला होता. फुलांच्या सजावटीसाठी प्रसिद्ध असलेल्या सुभाष सरपाले यांनी हा शिवरथ तयार केला होता. जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज बँड, चेतक स्पोर्ट्स क्लब, तसेच नादब्रह्म, शिवगर्जना ही ढोलताशा पथके मिरवणुकीत सहभागी झाली होती. शेकडो कार्यकर्त्यांचा या मिरवणुकीत सहभाग होता.
श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव
मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपती मंडळाच्या अग्रभागी लोणकर बंधूंचा नगारावादन होते. स्मार्ट सिटी आणि अन्य सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारे रथही या मिरवणुकीत होते. स्व-रूपवर्धिनी, गजलक्ष्मी, हिंदू तरुण मंडळ यांची ढोलताशा पथकेही या मिरवणुकीत होती. मंडळाने मिरवणुकीसाठी फुलांचा भव्य रथ तयार केला होता.
श्री केसरी गणेशोत्सव 
मिरवणुकीतील मानाच्या पाचव्या श्री केसरी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत प्रारंभी बिडवे बंधूंचा सनई चौघडा वादन होते. त्यानंतर श्रीराम, शौर्य, शिवमुद्रा पथके, इतिहासप्रेमी मंडळाचे प्रसंगनाटय़, प्रयास संस्थेचे सामाजिक नाटय़ या क्रमाने श्री केसरी गणेशोत्सवाची मिरवणूक काढण्यात आली.