पुणे : देशातील उद्योग क्षेत्राच्या समस्या आणि धोरणांबाबत संशोधनासाठी गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत ‘सेंटर फॉर एक्सलन्स इन आंत्रप्रुनरशिप अँड डेव्हलपमेंट’ (सीईईडी) स्थापन करण्यात येणार आहे. दे आसरा या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने उभे राहणारे हे केंद्र प्रामुख्याने अतिसूक्ष्म (नॅनो) उद्योगांसाठीचे देशातील पहिलेच केंद्र ठरणार असून, या उद्योगांशी संबंधित संस्था-संघटनांना सोबत घेऊन धोरण निर्मिती, संशोधन करण्याचे नियोजन आहे. केंद्राच्या संचालक डॉ. ललितागौरी कुलकर्णी यांनी या केंद्राविषयी माहिती दिली.
देशातील उद्योग क्षेत्रामध्ये जवळपास ९५ टक्के वाटा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा आहे. तर एमएसएमई क्षेत्रात मोठा वाटा अतिसूक्ष्म उद्योगांचा आहे. मात्र या उद्योगांसाठी शासकीय पातळीवर धोरणे नाहीच, त्यांना उद्योगात स्वतंत्र स्थान मिळाले पाहिजे, या उद्योगांचे वर्गीकरण करून या उद्योग क्षेत्राची स्वतंत्र व्याख्या करण्याचीही गरज आहे, ही बाब लक्षात घेऊन दे आसरा या संस्थेच्या सहकार्याने गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेने ‘सेंटर फॉर एक्सलन्स इन आंत्रप्रुनरशिप अँड डेव्हलपमेंट’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्राच्या अनुषंगाने सोमवारी सायंकाळी चार वाजता संस्थेत लेखिका आणि अशोका विद्यापीठातील प्रा. रश्मी बन्सल यांचे ‘बॅरिअर्स टू आंत्रप्रुनरशिप इन करंट इंडियन एन्व्हायर्न्मेंट’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.