विघ्नहर्त्यां गणरायाचा उत्सव यशस्वी करण्यासाठी आपले काम चोखपणे पार पाडणाऱ्या आदिशक्तीचा मंगळवारी जागर सन्मान झाला. विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या २५ महिलांच्या कृतज्ञता सत्कारासह ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करणाऱ्या महापालिकेच्या अडीचशे सफाई कर्मचाऱ्यांना ‘मंडई विद्यापीठा’तर्फे गौरविण्यात आले.
गणेशोत्सव यशस्वीपणे पार पडल्यानंतर अखिल मंडई मंडळातर्फे मंडळाच्या उत्सव मंडपामध्येच या आगळय़ावेगळय़ा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस उपायुक्त तुषार दोशी यांच्या हस्ते शोभना कुलकर्णी, विद्या घाणेकर, मेधा आदमाने, सुधा राडकर, शोभा कुर्तकोटी या महिला पुरोहित, ३५ वर्षांपुढील महिला ढोलपथकातील स्मिता इंदापूरकर, श्वेता इंदापूरकर, मोहिनी थोरात, राजश्री नायडू, मनीषा गोरे, महिला अथर्वशीर्ष उपक्रमाच्या संघटक शुभांगी भालेराव, नगारावादन करणारी निकिता लोणकर, गणेशोत्सवातील देखाव्यांना आवाज देणाऱ्या वृषाली पटवर्धन, शारदा-गजाननाची मूर्ती रंगविणाऱ्या संगीता वेदपाठक, गणेशमूर्तीचे रंगकाम करणाऱ्या उमा धोंडफळे आणि सरिता पवार, पूजा साहित्य आणि सजावटीच्या क्षेत्रातील पूजा मेढेकर, वर्षां नेगावी, साक्षी शिंदे, अनिता आढाव, उकडीचे मोदक करणाऱ्या प्रियंका कुंटे, संपदा परदेशी, ज्योती गोडबोले, अरुणा मसूरकर, भजनसेवा करणाऱ्या पुष्पा बुटाला आणि रंगावली पथकाच्या रोमा लांडे या महिलांचा सन्मान करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कोशाध्यक्ष संजय मते, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराचे विश्वस्त शिरीष मोहिते, ढोल-ताशा महासंघाचे पराग ठाकूर, श्री तुळशीबाग मंडळाचे नितीन पंडित या वेळी उपस्थित होते. फरासखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक रेखा साळुंके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्ती असलेल्या प्रत्येक महिलेचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्टय़ासह परिचय करून देत आनंद सराफ यांच्या निवेदनामुळे कार्यक्रम रंगला. शारदा-गजाननाचे चित्र असलेले उपरणे, छोटेखानी वस्तू आणि श्रीफळ देऊन या आदिशक्तींचा सन्मान करण्यात आला. तुषार दोशी म्हणाले, पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची परंपरा जतन करण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबरच महिलादेखील झटत असतात. महिलांच्या सहभागाने या उत्सवाला चांगले स्वरूप प्राप्त झाले आहे. वेगवेगळय़ा क्षेत्रांत मूकपणाने आपले काम यशस्वीपणे पार पाडणाऱ्या महिलांचा सत्कार ही नावीन्यपूर्ण आणि प्रशंसनीय गोष्ट आहे.