शहराच्या विविध भागांतील मॉलमध्ये केवळ चैनीच्याच नाही, तर किराणा
मॉलमध्ये चैनीच्या वस्तूंची खरेदी आणि घराजवळच्या किराणा दुकानदाराकडे जीवनावश्यक वस्तूंची खरेदी हा प्रकार आता बदलला आहे आणि सगळीच खरेदी मॉलमध्ये होऊ लागली आहे. परिणामी शहरातल्या छोटय़ा व्यापाऱ्यांचा व्यापार-उलाढाल कमी होत असून सर्वच आर्थिक स्तरातील कुटुंब मॉलमधील खरेदीकडे वळत आहे. त्यामुळे छोटय़ा व्यापाऱ्यांकडे जो किरकोळ ग्राहक प्रामुख्याने येत आहे तो फक्त उधारीचा ग्राहक आहे. मॉलमध्ये खरेदीचा कल अधिक होण्याचे मुख्य कारण हे सर्वच गोष्टी एकाच ठिकाणी मिळत आहेत हे मुख्य आहे आणि त्या बरोबरच काही ना काही सवलतींचे आकर्षण मॉलमधील किराणा खरेदीत आहे. शिवाय मॉलमध्ये खेळणी, खाऊगल्ली, मनोरंजनाची अनेकविध साधने ही आकर्षणे आहेतच.
मॉलचे आकर्षण का..
सुटीची सायंकाळ आनंददायी होते
बाजारभावापेक्षा स्वस्त दरात किराणा मिळतो
मुलांसाठी खेळांसह अनेकविध आकर्षणे
सणांच्या निमित्ताने मोठय़ा सवलती
तरीही हा त्रास आहेच..
खरेदीनंतर बिल होईपर्यंत पाऊण ते एक तासाच्या रांगा
अनावश्यक खरेदी भरपूर होते
रांगेत असताना अनेक गोष्टी खरेदी केल्या जातात
अनेक ठिकाणी पार्किंगचीही समस्या
मॉलकडे ग्राहकांचा कल मोठा आहे आणि त्यामुळे छोटय़ा व्यापाऱ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे ही गोष्ट खरी आहेच; शिवाय लवकरच जे आणखी मोठे संकट उभे राहणार आहे त्याची सुरुवात झाली आहे. थेट परदेशी गुंतवणूक हे ते संकट आहे. त्या संकटामुळे लहानच काय, पण सर्वच व्यापाऱ्यांपुढे संकट येणार आहे. एफडीए बद्दल सत्तेत नसताना जी भूमिका भाजपची होती ती आता पूर्णत बदलली आहे आणि आता नेमकी उलटी भूमिका त्या पक्षाने घेतली आहे. या धोरणामुळे परदेशी गुंतवणुकीच्या कंपन्यांपुढे छोटय़ा व्यापाऱ्यांचा टिकाव लागणे त्यामुळेच अवघड होणार आहे.
– वालचंद संचेती, ज्येष्ठ व्यापारी, उद्योजक, माजी अध्यक्ष दी पूना र्मचटस् चेंबर