पितृपक्षातील पंधरवडय़ात धार्मिक कार्य होत नसल्यामुळे फुलांचे भाव सोमवारी कोसळले आहेत. त्याचा मोठा फटका फूलउत्पादक शेतकऱ्यांना बसला असून गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये विक्रीसाठी आणलेली फुले ग्राहकांअभावी सोमवारी फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. गेल्या आठवडय़ात गणेशोत्सवामुळे फुलांचे दर तेजीत होते, तर चालू आठवडय़ात फुलांच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे.

यंदा बाजारात सर्वच फुलांची आवक मोठय़ा प्रमाणावर होत आहे. त्यामुळे दर कोसळले असून परिणामी शेतकऱ्यांवर फुले फेकून देण्याची वेळ आली आहे. पितृपंधरवडय़ात कोणतेही धार्मिक कार्य शक्यतो नसते. त्यामुळे फुलांची मागणी आणि दर दोन्ही कोसळले. गेल्या दोन दिवसांपासूनच फुलांची जास्त आवक बाजारात होत होती. त्यामुळे मागणीपेक्षा आवक जास्त झाल्याने दर कोसळले, अशी माहिती फुलविक्रेते सागर भोसले यांनी दिली. विक्री न झाल्यामुळे तब्बल सात ते आठ टन झेंडू फेकून द्यावा लागला. फुलबाजारात दुपारी झेंडूचे ढीग लागले होते.

गणेशोत्सवानंतर फुलांची मागणी कमी झाली आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याने फुलांना उठाव नाही. फुले नाशवंत असल्याने व्यापाऱ्यांनी फुले येईल त्या दराने विकली. जी फुले विकली गेली नाहीत ती जागेवरच टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

घाऊक बाजारात सोमवारी चार पोती झेंडू आणला होता. मात्र विक्री कमी झाली. शिल्लक राहिलेला झेंडू फेकून देण्याशिवाय पर्याय नव्हता. परत नेण्यासाठी वाहतुकीचा खर्च परवडत नाही आणि नाशवंत असल्याने परत नेऊनही उपयोग नसतो.

– कोंडिबा पिसाळ, शेतकरी, जेजुरी