समाजऋण फेडण्याच्या उद्देशातून ‘आर्टिस्ट्री’ संस्थेतर्फे आयोजित ‘देणे समाजाचे’ या अभिनव उपक्रमांतर्गत दहा वर्षांत ९० संस्थांना ६० लाख रुपयांचे दान लाभले आहे. ज्यांच्याकडे दान करण्याची क्षमता आहेस पण कोणाला पैसे द्यावेत हे ध्यानात येत नाही अशा व्यक्तींसाठी सामाजिक संस्थांच्या कार्याचे प्रदर्शन भरवून या संस्थांना मदत मिळवून देण्यासाठी आर्टिस्ट्री संस्था दुवा म्हणून काम करते.
आपल्या संस्कृतीमध्ये मातृऋण, पितृऋण याप्रमाणेच समाजऋण ही संकल्पना आहे. पितृपंधरवडय़ाचे औचित्य साधून आर्टिस्ट्री संस्थेतर्फे २००५ पासून ‘देणे समाजाचे’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. निरनिराळय़ा क्षेत्रात कार्यरत असलेल्या राज्यभरातील संस्थांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविणे, त्यांच्या कार्याचा समाजाला परिचय करून देणे आणि त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे यासाठी ही संस्था व्यासपीठ म्हणून काम करते. आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ कोणीही या सामाजिक संस्थांना आर्थिक स्वरूपात मदत करू शकतो. या प्रदर्शनात सहभाग घेण्यासाठी सामाजिक संस्थांकडून कोणतेही मूल्य आकारले जात नाही. ‘देणे समाजाचे’ प्रदर्शनाच्या माध्यमातून दहा वर्षांत ९० सेवाभावी संस्थांची माहिती समाजासमोर आली असून, समाजाकडूनही या संस्थांना आतापर्यंत सुमारे ६० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. ५० हजार नागरिकांनी या उपक्रमाला समक्ष भेट दिली आहे, अशी माहिती संस्थेच्या वीणा गोखले यांनी सोमवारी दिली.
‘देणे समाजाचे’ या उपक्रमांतर्गत शुक्रवारपासून (९ ऑक्टोबर) तीन दिवस कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉल येथे होणाऱ्या प्रदर्शनामध्ये सेवाभावी काम करणाऱ्या ३० संस्था आपल्या कार्याची माहिती लोकांसमोर मांडणार आहेत. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी दहा वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट या वेळी उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस दररोज सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनासाठी लागणाऱ्या निधीची पूर्तता न झाल्यामुळे समाजातील दानशुरांनी आर्टिस्ट्री संस्थेला मदत करावी. अधिक माहितीसाठी ९८२२०६४१२९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Oct 2015 रोजी प्रकाशित
दहा वर्षांत ९० संस्थांना ६० लाख रुपयांचे दान लाभले!
समाजऋण फेडण्याच्या उद्देशातून ‘आर्टिस्ट्री’ संस्थेतर्फे दहा वर्षांत ९० संस्थांना ६० लाख रुपयांचे दान लाभले आहे.
Written by दिवाकर भावे
First published on: 06-10-2015 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Help of rs 60 lakhs for 90 associations by artistry