मतदारांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागू नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कायमस्वरूपी हेल्पलाइन सुरू करण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश ढोरे यांनी दिली. लोकसभेच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांना याच लोकसभेसाठी मतदानाची संधी मिळावी, या मागणीवरही पक्ष ठाम असल्याचे ढोरे यांनी स्पष्ट केले.
मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांनी ‘२०४, जपे सदन, झेड ब्रीजसमोर, नारायण पेठ’ या पत्त्यावरील मनसेच्या शहर कार्यालयात प्रत्यक्ष भेटून किंवा २४४८७६५१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे पक्षाचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्या DeepakPaigude.MNS.Pune या फेसबुक पेजवर deepak.paigude@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन ढोरे यांनी केले आहे.
मतदार यादीतील घोळामुळे लोकसभेच्या या निवडणुकीत हजारो पुणेकरांना मतदानाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागले. मतदार यादीत घेळ व चुका असतील, तर काहीही केले तरी निवडणुकीची व मतदानाची प्रक्रिया पायदर्शक होणे कठीण होऊन बसेल. सत्ताधारी पक्षांकडून प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर करून मतदार याद्यांमध्ये होणारे फेरफार म्हणजे लोकशाहीचा खून आहे, असा आरोप ढोरे यांनी केला आहे. मतदार याद्यांमध्ये प्रत्येक वेळी घोळ होतो. त्यामुळे पुढील काळात मतदार याद्यांची प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी व कोणत्याही मतदाराला त्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी मनसेच्या वतीने ही कायमस्वरूपी हेल्पलाइन सुरू करण्यात येत आहे, असे ढोरे यांनी सांगितले.