अवेळी पावसाचा फटका; तुटवडय़ामुळे खराब पालेभाज्यांनाही चांगला दर
मोसमी पाऊस देशातून माघारी फिरला असला तरी राज्यात अवकाळी पाऊस सुरू असून त्याचा पालेभाज्यांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्या आहेत. बाजारात सध्या पालेभाज्यांचा तुटवडा जाणवत असल्याने दुय्यम प्रतीच्या पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत. शहरातील किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथी, मुळा, पालक, शेपू, कांदापात या पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत.
साधारणपणे दिवाळीच्या आसपास पालेभाज्यांचे नवीन पीक हाती येते. यंदा मात्र पावसाने उघडीप दिली नाही. उन्हाळ्यात पालेभाज्या तेजीत असतात. कारण पाणीटंचाईमुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होतो. पावसाळा सुरू झाल्यानंतर साधारणपणे नवरात्रोत्सवानंतर पालेभाज्यांचे नवीन पीक हाती येते. मात्र, यंदा पावसाने उसंत न घेतल्याने पालेभाज्यांच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला असल्याची माहिती किरकोळ बाजारातील विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी दिली.
दिवाळीच्या आसपास पालेभाज्यांचे दर उतरतात. सर्वसामान्यांच्या आवाक्यात पालेभाज्यांचे दर येतात. एका जुडीचा दर साधारपणे दहा ते पंधरा रुपयांपर्यंत राहतो. अवेळी पावसामुळे पालेभाज्यांचे पीक हाती येण्यापूर्वीच खराब झाले आहे. त्यामुळे दुय्यम प्रतवारीच्या पालेभाज्यांना बाजारात चांगले दर मिळाले आहेत. सध्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या पालेभाज्यांची प्रतवारी तितकीशी चांगली नाही. घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या जुडीचे दर तेजीत असल्याने किरकोळ बाजारात दर चढेच असल्याचे ढमढेरे यांनी नमूद केले. मेथी, कोथिंबीर, मुळा, पालक, कांदापात, शेपू या पालेभाज्यांना मागणी असते. त्यातुलनेत चवळई, करडई, अंबाडी, चुका, पुदिना या पालेभाज्यांना तशी कमी मागणी असते, असे त्यांनी सांगितले.
किरकोळ बाजारात पालेभाज्यांच्या जुडीचे दर
कोथिंबीर ४० ते ६० रुपये
मेथी २५ ते ३० रुपये
मुळा ३० ते ३५ रुपये
पालक ४० ते ४५ रुपये,
शेपू २० ते २५ रुपये
कांदापात २५ ते ३० रुपये
पुणे जिल्ह्य़ात पुरंदर तालुक्यातील सासवड परिसर, हडपसर, उरळी कांचन, लोणी काळभोर, यवत परिसरात पालेभाज्यांची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. मुंबईतील बाजारात नाशिक भागातील पालेभाज्या विक्रीसाठी पाठविल्या जातात. पुढील दोन ते तीन दिवस पाऊस असाच राहिला तर पालेभाज्यांचे मोठे नुकसान होईल. पुढील महिनाभर तरी पालेभाज्या तेजीत राहणार आहेत.
– प्रकाश ढमढेरे, भाजी विक्रेते, किरकोळ बाजार
