• काळेवाडीतील घटना; अल्पवयीन आरोपीसह दोन अटकेत
  • तिला दुरून पाहताच ‘झिंगाट सेलिब्रेशन’

‘सैराट’च्या अफाट लोकप्रियतेमुळे दररोज वेगवेगळे अनुभव घेणारी ‘टीम नागराज’ मेताकुटीला आली असतानाच ‘आर्ची’ची डोकेदुखी वाढवणाऱ्या एका नव्या घटनेची त्यात भर पडली आहे. ‘आर्ची’ला पाहण्यासाठी अकलूजला जायचे, मात्र पैसे नाहीत म्हणून एका अल्पवयीन आरोपीने चक्क घरफोडी केल्याची घटना उजेडात आली आहे. घरफोडीत मिळालेले ५० हजार रुपये आणि चोरीच्या दोन दुचाकी घेऊन गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या एका सहकाऱ्यासह तो अकलूजला गेला. आर्चीच्या शाळेजवळ तिला पाहिल्याचा इतका आनंद झाला की तो साजरा करण्यासाठी १५ हजार रुपये उडवल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाकड पोलिसांनी एक सराईत व एका अल्पवयीन आरोपीला या प्रकरणात अटक केली आहे. काळेवाडी परिसरात राहणाऱ्या या आरोपींनी परिसरात घरफोडी केली. दोन दुचाकी वाहनांची चोरीही केली. घरफोडीत त्यांना ५० हजार रुपये मिळाले. या घरफोडीविषयी व आरोपींविषयी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली. त्यानंतर, पोलिसांना कबुली देताना अल्पवयीन आरोपीचे कथन ऐकून पोलीसही चक्रावून गेले. मी सैराट अनेकदा पाहिला. मला ‘आर्ची’ आवडते. तिला पाहण्याची खूप इच्छा होती. त्यासाठी अकलूजला जायचे होते. मात्र, त्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे एका साथीदारासमवेत घरफोडी केली आणि दुचाकीवर तिकडे गेलो. एक दिवस मुक्कामही केला. शाळेत जाण्यासाठी म्हणून ‘आर्ची’ आली होती. तिला भेटता आले नाही. मात्र, समक्ष पाहिल्याचा खूप आनंद झाला. जवळच्या एका हॉटेलमध्ये तो आनंद साजरा केला. तिथेच १५ हजार रुपये खर्च झाल्याची माहिती त्याने दिल्यावर पोलीस थक्क झाले. आरोपींकडून दोन्ही दुचाकी व खर्च न झालेले २० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House robbery for money