चंद्रकांत दळवी यांचा सल्ला

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्यांना चांगले करिअर करायचे आहे, त्यांनी प्रशासकीय सेवेच्या पर्यायाचा जरूर विचार करावा. कोणत्याही विद्याशाखेतील शिक्षणानंतर प्रशासकीय सेवेत येण्याची संधी तुम्हाला उपलब्ध आहे आणि असंख्य पर्याय व अनेक संधी या सेवेत आहेत, अशा शब्दांत विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी प्रशासकीय सेवेचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर विशद केले.

दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘लोकसत्ता’तर्फे ‘मार्ग यशाचा’ या करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

तुम्ही सर्व जण तुमच्या करिअरची निवड नियोजनपूर्वक आणि विचारपूर्वक करत आहात. त्यामुळे तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असे सांगून दळवी म्हणाले, ‘‘प्रशासकीय सेवेत नोकरी करत असतानाच आपण लोकांच्या ज्या समस्या किंवा प्रश्न सोडवतो त्यातून सामाजिक सेवाही आपोआप घडत असते. म्हणून करिअरची निवड करताना प्रशासकीय सेवा या क्षेत्राचा जरूर विचार केला पाहिजे.

या सेवेच्या माध्यमातून तुम्ही समाजात नक्कीच चांगले बदल घडवून आणू शकता. केवळ विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतरच प्रशासकीय सेवेत जाता येते असे नाही तर कला, वाणिज्य, अभियांत्रिकी, वैद्यक अशा कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जाता येते.

प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी स्पर्धा परीक्षेला पर्याय नाही आणि स्पर्धा परीक्षेबाबत आपल्याकडे गैरसमज खूप आहेत. त्यामुळे या परीक्षांची योग्य प्रकारे तयारी करणे हे महत्त्वाचे आहे, असेही दळवी म्हणाले.

स्पर्धा परीक्षेचे तंत्र, त्यातील लेखी परीक्षा, जनरल नॉलेज या विषयाची तयारी कशी करावी, अशा विविध विषयांवरही दळवी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थी म्हणतात..

‘‘दहावीनंतरच्या पर्यायांविषयी शंका होत्या. या कार्यशाळेतून त्या दूर झाल्या. करिअर निवडण्यासाठी काय-काय माहिती घ्यायला हवी हे कळले.’’

– संजना साठे (दहावी)

‘‘अभियांत्रिकीमधील विविध शाखांची माहिती मिळाली. करिअरच्या पर्यायांविषयी आणखीही जाणून घ्यायला आवडेल.’’

– शत्रुंजय भोसले (अभियांत्रिकी पदविका)

‘‘ ‘जेईई’ प्रवेश परीक्षेविषयी बरीच माहिती मिळाली. करिअर कशात करावे याविषयी काहीच माहीत नव्हते. विविध क्षेत्रांविषयी चांगले मार्गदर्शन मिळाले.’’

– मुग्धा भोसले, अस्मिता शेटे (दहावी)

‘‘करिअरविषयीचे माहीत नसलेले बरेच पर्याय कळले. परंतु काही पर्यायांना नुसता स्पर्श करता आला. त्याविषयी आणखी माहिती घ्यायची आहे.’’

– रुजुल पोतनीस (दहावी)

प्रायोजक

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेसाठी ‘अ‍ॅमिटी युनिव्हर्सटिी, मुंबई’ हे टायटल पार्टनर होते. ‘विद्यालंकार’ आणि ‘एमआयटी आर्ट डिझाइन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सटिी, पुणे’ हे असोसिएशन पार्टनर होते. सपोर्टेड बाय ‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स’ आणि पॉवर्ड बाय ‘गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट’ आणि ‘लक्ष्य अ‍ॅकॅडमी, ‘युवर फिटनेस्ट’ हे हेल्थ पार्टनर होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ias chandrakant dalvi guidance in loksatta marg yashacha workshop