पुणे : पावसाळय़ात वडगांवशेरी परिसरातील घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी अल्पकाळासाठीच्या योजना राबवितानाच दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी सूचना वडगांवशेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केली. पावसाळय़ात घरांमध्ये पाणी शिरल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विधीमंडळात केली जाईल, असा इशाराही सुनील टिंगरे यांनी दिला.
येरवडा कळस धानोरी लोहगाव क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या रहिवासी भागात गेल्या काही वर्षांपासून पावसाळय़ात सातत्याने पाणी शिरण्याच्या घटना होत आहेत. या पार्श्वभूमीवर पाणी साचणारी आणि पूरग्रस्त ठिकाणे तसेच नालेसफाईची कामे यांची पाहणी आमदार टिंगरे यांनी सोमवारी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, वैभव कॉलनी, फुलेनगर, प्रतीकनगर, शांतीनगर, गंगा कुंज सोसायटी, कळस, वैभव कॉलनी, धनेश्वर शाळा, मुंजबा वस्ती, धानोरी, किलबील सोसायटीलगतचा नाला, लक्ष्मीनगर सोसायटी, संकल्प सोसायटी, कर्मभूमी नगर, लोहगांव आणि कलवड या भागाची पाहणी त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांबरोबर केली. पूर परिस्थिती निर्माण होण्याची कारणे काय आहेत, त्यावर सध्या केलेल्या उपाययोनजा आणि प्रस्तावित दीर्घकालीन उपाययोजनांची माहिती टिंगरे यांनी घेतली. दीर्घकालीन उपायोयजना करण्याबाबतचा अहवाल सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. दरम्यान, यासंदर्भात येत्या गुरुवारी आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे टिंगरे यांनी सांगितले. माजी नगरसेविका शितल सावंत, शशी टिंगरे, अशोक खांदवे, नवनाथ मोझे, बंडू खांदवे, राजेंद्र खांदवे, मिलिंद खांदवे, विश्वास खांदवे, माजी नगरसेवक सतिश म्हस्के, येरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालयाचे पुणे मनपा सहायक आयुक्त वैभव कडलख यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.