जेजुरी : मान्सूनपूर्व पावसापूर्वी उपयुक्त पाणीसाठा संपलेल्या जेजुरी शहर, औद्योगिक वसाहत, मोरगाव आणि अन्य ३६ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नाझरे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आता या धरणाचा उपयुक्त पाणीसाठा साडेसात टक्के झाला आहे.नाझरे धरणाची पाणीसाठा क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट एवढी असून, २०० दशलक्ष घनफूट मृत पाणीसाठा मानला जातो. यापूर्वी धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपून मृत पाणीसाठ्यातील पाणी वापरले जात होते. आता पाणी पातळीत वाढ झाली आहे.या धरणावर पिण्याच्या पाण्याच्या व शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक योजना अवलंबून आहेत. सासवड परिसरातील गराडे, नारायणपूर, चांबळी या परिसरात मान्सूनपूर्व पाऊस भरपूर झाल्याने कऱ्हा नदी दुथडी भरून वाहत आहे. हे पाणी चार दिवसांपूर्वी नाझरे धरणापर्यंत पोहोचले. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
सासवड ते जेजुरीतील नाझरे धरण हे अंतर सुमारे २० किलोमीटर आहे. यापूर्वी नदीचे पात्र कोरडे पडले होते. आता कऱ्हा नदी वाहत असल्याने नदीच्या पात्राशेजारील पाझर तलाव भरले आहेत.सासवड परिसरात पुरेसा पाऊस झाल्यावर कऱ्हा नदीतून नाझरे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येते. त्यानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरते. जेजुरीत दररोज हजारो भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी येतात. भाविकांना याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाणीसाठा कमी झाल्यास औद्योगिक वसाहतीलाही अनेक वेळा पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. धरणात पाणीसाठा वाढत असल्याने संबंधितांना दिलासा मिळाला आहे.
मागील वर्षी मे महिन्यात नाझरे धरण कोरडे पडले होते, त्यातील गाळही मोठ्या प्रमाणात काढण्यात आला. यंदा धरणात १९५ दशलक्ष घनफूट एवढा मृत पाणीसाठा शिल्लक आहे. आता कऱ्हा नदीचे पाणी नाझरे धरणात पोहोचल्याने पाणीसाठा वाढत आहे. पुरेसा पाऊस झाल्यास धरण लवकर भरण्याची शक्यता आहे.अनिल घोडके, शाखा अभियंता