एखादी नवीन कल्पना मांडून त्यातून उद्योगाची उभारणी करण्याचे आव्हान पुण्यातील काही उद्योजकांनी यशस्वीपणे पेलले आहे. त्यांच्या वेगळ्या प्रयत्नांना व्यावसायिक यशाचे फळही मिळू लागले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’पासून अमेरिकेपर्यंत या व्यावसायिक नवकल्पनांची भरारी आहे.
कल्पनांची भरारी अनेक जण घेतात. परंतु, एखादी कल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरविण्याची कामगिरी पुण्यातील काही उद्योजकांनी केली आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी कल्पनांचा विस्तार जागतिक क्षितिजावर केला आहे. पुण्यातील मिलिंद पडोळे या उद्योजकाने रोबोटिक क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाची कास धरून ‘ॲफोर्डेबल रोबोटिक अँड ऑटोमेशन लिमिटेड’ची (एआरएपीएल) स्थापना केली. या कंपनीने वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांसाठी वाहनांच्या वेल्डिंगसाठी स्वयंचलित रोबो यंत्रणा बनविली. कंपनीने साडेसात हजारांहून अधिक रोबो कंपन्यांना आतापर्यंत दिले आहेत.
याबाबत ‘एआरएपीएल’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद पडोळे म्हणाले, की ‘एआरएपीएल’ने वाहन क्षेत्रापुरते मर्यादित न राहता उपकंपनी ‘एआरएपीएल रास’च्या माध्यमातून गोदामामध्ये काम करणारे रोबो विकसित केले. सध्या हे रोबो अमेरिकेसह युरोपमधील गोदामांमध्ये कार्यरत आहेत. मालमोटारीतून सामान उतरवून ते गोदामामध्ये व्यवस्थित रचून ठेवण्यापर्यंतचे काम हे रोबो करतात. यात मानवी हस्तक्षेपाची आवश्यकता नसते. काम संपल्यानंतर हे रोबो स्वत: चार्जिंग स्थानकात जाऊन चार्ज होतात. अमेरिका आणि युरोपमध्ये मनुष्यबळाचा खर्च जास्त असल्याने कंपन्यांकडून या रोबोंना तिथे पसंती आहे.
पुण्यातील एका दाम्पत्यानेही चौकटीबाहेरचा विचार करीत अनोखी संकल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे. कीर्ती आणि मिलिंद दातार या दाम्पत्याने आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून एका नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. उसाचा ताजा रस देणारे स्मार्ट यंत्र विकसित केले. उसाच्या गुऱ्हाळाच्या ठिकाणी माश्या मोठ्या प्रमाणात असतात आणि अस्वच्छताही होत असते. त्यामुळे दातार दाम्पत्याने स्वच्छ आणि ताजा उसाचा रस देण्याचा हा प्रयोग यशस्वी केला. ‘केनबॉट’ ही कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून त्याला व्यावसायिक रूप देण्यात आले.
‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर’ने (एमसीसीआयए) कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील नवउद्यमींना प्रोत्साहन देण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचा फायदा ‘केनबॉट’ला झाला. क्रिकेटपटू अजिंक्य राहाणे यांनी ‘केनबॉट’मध्ये गुंतवणूक केली आहे. याबाबत ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबने म्हणाले, की ही फक्त सुरुवात आहे. आगामी काळात कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील नवउद्यमींना भांडवलउभारणीसह इतर मदत केली जाणार आहे. कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाधारित आणि व्यावसायिक पातळीवर यशस्वी होण्याची क्षमता असलेल्या नवउद्यमींना पाठबळ देण्याची आमची भूमिका आहे. महाराष्ट्र हे कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील नावीन्याचे केंद्र बनावे, हा आमचा उद्देश आहे.
दिव्यांचे स्मार्ट व्यवस्थापन
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. त्या वेळी युद्धजन्य काळात अमृतसरमधील पथदिव्यांचे व्यवस्थापन करण्याचे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरले. पुण्यातील समुद्र एलईडी कंपनीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हजारो पथदिव्यांचे एकाच वेळी व्यवस्थापन शक्य झाले. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान कंपनीच्या ‘लाइटिंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर’च्या (एलएमएस) मदतीने काही क्षणांत शहरातील तब्बल ८० हजार पथदिवे बंद करणे प्रशासनाला सोपे झाल्याने याची मदत ऑपरेशन सिंदूर दरम्यान महत्त्वपूर्ण ठरली. या मदतीकरिता समुद्र एलईडीचे कौतुक अमृतसर स्मार्ट सिटीच्या वतीने नुकतेच करण्यात आले, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल थोते यांनी दिली. sanjay.jadhav@expressindia.com