विश्रांतवाडी येथे घडलेल्या एका विवाहितेने आत्महत्या केल्याचा गुन्हा तीन वर्षांपूर्वी दाखल झाला होता. मात्र, ही आत्महत्या नसून खून असल्याच्या संशयाने या प्रकरणाचा फेरतपास करण्याचे आदेश न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
सीमा धनंजय सिंह (वय २३, रा. विश्रांतवाडी) या महिलेने ८ जानेवारी २०११ रोजी आत्महत्या केल्याचा गुन्हा पोलिसांकडे नोंदविण्यात आला होता. मात्र ही आत्महत्या नसून पती धनंजय सिंह (वय २८) याने मित्राच्या मदतीने खून केला असल्याची फिर्याद सीमाचा भाऊ चंद्रशेखर सियाराम सिंह (वय ३८, रा. धानोरी रस्ता) यांनी दिली आहे. सीमाने गळफास घेऊन आत्महत्या केली व दरवाजा तोडून मित्राच्या मदतीने तिला खाली उतरविले असल्याचे तिच्या पतीने चंद्रशेखर यांना सांगितले होते. घटनास्थळी त्यावेळी लॅपटॉप, पेनड्राईव्ह व एक डायरीही चंद्रशेखर यांना मिळाली होती. त्यात काही छायाचित्र सापडली होती व त्यावरून धनंजय याचा पूर्वी विवाह झाल्याचे स्पष्ट होत होते.
दार तोडून घरात प्रवेश केल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात दाराचे नुकसान झालेले नव्हते. त्याचप्रमाणे घटनेपूर्वी चार तास आधी सीमाने तिच्या मैत्रिणीला दूरध्वनी केला होता व दोन दिवसांनी कामावर हजर होणार असल्याचे सांगितले होते. हा सर्व घटनाक्रम लक्षात घेऊन तपास करण्याची मागणी चंद्रशेखर यांनी केली होती. मात्र पोलिसांनी कोणताही तपास केला नाही. त्यामुळे चंद्रशेखर यांनी गृहमंत्री व उच्च न्यायालयातही धाव घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सत्र न्यायालयात अर्ज केल्यानंतर या प्रकरणाच्या फेरतपासाचे आदेश देण्यात आले.