जूनच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पुण्यात वरुणराजाने जोरदार आगमन केल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. पण नंतर पावसाने दडी मारल्याचे दिसून आले होते. आता पुन्हा दोन दिवसांपासून पावसाने शहरात आणि धरणक्षेत्रात हजेरी लावली आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून सद्यस्थितीला २.८३ टीएमसी इतका पाणीसाठा असून, गतवर्षी आजच्या तारखेला या चारही धरणांत १.५६ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक होता. या आकडेवारीवरून पुणेकरांना अजून अडीच महिने पुरेल इतका पाणीसाठी धरणांमध्ये असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, वरसगाव आणि टेमघर या दोन धरणांत सध्या शून्य टक्के पाणी साठा असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पुणे शहराला पानशेत, टेमघर, खडकवासला आणि वरसगाव या चार धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या धरणात मागील दोन वर्षाच्या तुलनेत यंदा समाधानकारक साठा उपलब्ध आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. गेल्यावर्षी पुणेकरांना पाणी संकटामुळे दिवसाआड पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागला होता. पावसाने गतवर्षी देखील उशिरा हजेरी लावली होती. त्यानंतरही ही चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. यंदाची परिस्थिती लक्षात घेता धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असून, वरुणराजाने अद्याप धो धो बरसण्यास सुरुवात केलेली नाही.