गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये नावीन्यपूर्ण विषय हाताळत गणेशभक्तांना
पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाचे विसर्जन मिरवणूक हे खास आकर्षण असते. हरहुन्नरी कलाकार जीवन रणधीर आणि गणेशोत्सव असे एक अनोखे नाते होते. नावीन्यपूर्ण विषयांची गुंफण करीत गेली ३५ वर्षे जीवन रणधीर यांनी पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आहे. ही परंपरा त्यांचा २५ वर्षांचा मुलगा क्षितिज हा पुढे नेत आहे. ‘जीवन चलने का नाम’ असे म्हणत जीवन रणधीर यांची आठवण करून देणारे श्री जिलब्या मारुती मंडळ ट्रस्ट आणि वीर हनुमान मित्र मंडळ यांच्यासाठी केलेले रथ क्षितिजच्या स्वतंत्र कलात्मकतेचा आविष्कार यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्टय़ ठरणार आहेत.
जीवन रणधीर हे जिलब्या मारुती मंडळाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीचा रथ हे जणू त्यांच्यासाठी घरचेच कार्य असायचे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी केलेला रथ, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त केलेला रथ, भारताने दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषक करंडक जिंकल्यानंतर संघाचे अभिनंदन करण्यासाठी केलेला रथ, ज्येष्ठ शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्न किताब मिळल्यानंतर त्यांचे अभिवादन करण्यासाठी केलेला रथ असे जीवन रणधीर यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांनी सजलेले कलात्मकतेचे आविष्कार पुणेकरांच्या अजूनही स्मरणात आहेत. आता जीवन यांच्यानंतर त्यांचा मुलगा क्षितिज याने ही धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.
जिलब्या मारुती मंडळासाठी जीवन यांनी आतापर्यंत केलेल्या रथांचे वेगळेपण एकत्रितरीत्या दाखवून क्षितिज याने ‘कला स्मृती रथ’ केला आहे. वारा घेण्यासाठी वापरले जाणारे कागदी पंखे, भिरभिरे, पतंग, पत्र्यावर केलेले रंगकाम, पुलंना अभिवादन करताना रथावरचे पुस्तक अशा सर्वच गोष्टींचा ‘कोलाज’ करण्यात आला आहे. ‘जीवन रणधीर यांना अभिवादन करण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे’ क्षितिज याने सांगितले. वडिलांसमवेत लहानपणापासूनच मी काम करतो आहे. मात्र, गेली सहा वर्षे सजावटीमध्ये मी खऱ्या अर्थाने योगदान दिले. आता वडिलांच्या निधनानंतर प्रथमच स्वतंत्ररीत्या काम करीत असल्याचे क्षितिजने सांगितले. तो ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’मध्ये (एफटीआयआय) कला दिग्दर्शन हा अभ्यासक्रम शिकत आहे. सध्या सर्व विद्यार्थी संपावर असल्यामुळे तेथील पोस्टर आणि बॅनर करण्याबरोबरच गणेश विसर्जनाचे रथ करण्याची दुहेरी जबाबदारी तो सांभाळत आहे.
धर्मनिरपेक्ष शिवराय
वीर हनुमान मित्र मंडळासाठी ‘धर्मनिरपेक्ष शिवराय’ हा रथ क्षितिज करीत आहे. सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजीमहाराज यांच्यासमवेत मुस्लीम सरदार आणि वेगवेगळ्या जाती-जमातींचे मावळे अशा आठ शिल्पांचा या देखाव्यामध्ये समावेश आहे. शिवरायांची धर्मनिरपेक्षता अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे क्षितिज याने सांगितले.