रेणुका स्वरूप शाळेजवळील बसथांब्यावर सोमवारी दुपारी बस थांबली आणि चक्क काही पक्षी बसमध्ये चढले.. घार, गरूड, कबुतर, पोपट, चिमणी अशा पक्ष्यांना बघून बसमधील प्रवाशांनीही त्यांना बसायला जागा दिली.. हे पक्षी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उतरले आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी ‘आम्हाला वाचवा,’ असे निवेदन दिले..
 चकित झालात ना? हे पक्षी म्हणजे रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनीच होत्या.
सध्या सुरू असलेल्या पतंग उडवण्याच्या हंगामात चायनीज मांजामुळे शहरात अनेक पक्षी जखमी होत असून यातील काहींना प्राणास मुकावे लागत असल्याची वस्तुस्थिती ‘लोकसत्ता’ने नुकतीच एका वृत्तात मांडली होती. ही बातमी वाचून शाळेच्या पाचवी ते सातवीच्या ४२ विद्यार्थिनींनी अत्यंत कल्पक पद्धतीने शहरात चायनीज मांजावर बंदी घालण्यासंबंधीचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले. यातील १२ विद्यार्थिनींनी विविध पक्ष्यांचा वेश धारण केला तर इतर विद्यार्थिनींनी या समस्येविषयी माहिती देणारे फलक हातात धरले. नागरिकांनीही या विषयात उत्सुकता दाखवावी म्हणून या ‘पक्ष्यां’नी मुद्दाम सार्वजनिक बस सेवेने प्रवास केला आणि तितक्याच आत्मविश्वासाने उपजिल्हाधिकाऱ्यांसमोरही विषय मांडला.       
 शाळेतील पर्यावरण विभागाच्या शिक्षिका प्रज्ञा सुधीर पवार म्हणाल्या, ‘‘शाळेच्या परिसरात अनेकदा कुठेतरी अडकलेल्या मांजात अडकून घायाळ झालेले पक्षी विद्यार्थिनींनी पाहिले होते. ‘लोकसत्ता’तील बातमी वाचल्यानंतर आम्ही बातमीत दिलेल्या क्रमांकांवर संपर्क करून आम्ही त्याविषयी अधिक माहिती मिळवली. तेव्हा नाशिकमध्ये या मांजावर बंदी घालण्यात आल्याचे समजले. उपजिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींचे निवेदन स्वीकारून नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी या संदर्भात बोलण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच शहरातील पतंग व मांजाविक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांच्याशीही हा विषय बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिथे जिथे या विद्यार्थिनी पतंग उडवताना पाहतील, तिथे त्या चायनीज मांजा न वापरण्याबाबत, तसेच मांजा तुटल्यावर त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासही सांगणार आहेत. मिळालेल्या आश्वासनांवरील कार्यवाहीचा अंदाज घेऊन या विषयावर सह्य़ांची मोहीम हाती घेण्याचेही आम्ही ठरवले आहे.’’