सर्वसामान्यांच्या घरासाठी जादा एफएसआय देण्याऐवजी ‘प्रिंटिंग मिस्टेक’चे कारण पुढे करून सामान्यांना फक्त दीड एफएसआय देणाऱ्या महापालिका प्रशासनानाने लक्ष्मी रस्ता परिसरातील ३८ हेक्टर जागेवर ‘कमर्शियल झोन’ दर्शवून तेथे मात्र तीन एफएसआय देऊ केला आहे. त्यामुळे लक्ष्मी रस्त्याच्या परिसरात व्यापारी वापराच्या वीस ते बावीस मजली इमारतींचा मार्ग मोकळा होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
पुणे शहरासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखडय़ात संत कबीर चौक ते टिळक चौक (अलका टॉकीज) या लक्ष्मी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना १०० ते १५० मीटपर्यंत ‘सी’ झोन (कमर्शियल झोन/ व्यापारी वापर) दर्शवण्यात आला आहे. लक्ष्मी रस्त्याच्या परिसरातील या सी झोनमुळे अतिशय दाट लोकवस्तीत शेकडो इमारती नव्याने उभ्या राहू शकतील. या झोनसाठी तीन एफएसआय वापरता येईल, तसेच ७० मीटर उंचीच्या इमारती उभारता येतील. त्यामुळे येथे वीस-बावीस मजली इमारती उभ्या राहू शकतील, अशी हरकत पुणे बचाव समितीने घेतली आहे. त्यासंबंधीची माहिती समितीचे सुहास कुलकर्णी, उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे, संजय बालगुडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
 लक्ष्मी रस्ता परिसरातील ३८ हेक्टर जागेवर हा झोन दर्शवण्यात आला असून या झोनमुळे वाहतुकीसह आधीच अनेक समस्या असलेल्या या भागात अनेक समस्या नव्याने निर्माण होणार आहेत. या ठिकाणी आता नव्याने निवासी बांधकामे होणार नाहीत, तर तीन एफएसआयचा वापर करून मोठय़ा प्रमाणावर व्यापारी वापराच्या बहुमजली इमारती उभ्या राहतील. त्यामुळे कोणाच्या फायद्यासाठी हा भाग ‘सी’ झोनमध्ये दर्शवण्यात आला आहे, अशी विचारणा समितीने केली आहे. हा झोन रद्द करून पूर्वीप्रमाणेच येथे निवासी विभाग ठेवावा, अशी सूचना समितीने नगर नियोजन अधिकाऱ्यांकडे नोंदवली आहे.
लक्ष्मी रस्ता परिसर आणि सर्व पेठांच्या भागांमध्ये निवासी बांधकामांसाठी तसेच वाडय़ांच्या विकासासाठी अडीच एफएसआय देणे आवश्यक आहे. मात्र, तेथे उपलब्ध असलेला सध्याचा दोन एफएसआय कमी करून तो दीड करण्यात आला आहे आणि ही प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे गरज नसताना पेठांच्या भागात सी झोन दर्शवण्यात आला आहे. त्यामुळे हा झोन रद्द करावा, अशी समितीची मागणी आहे.