पुणे शहरावर पावसाच्या रूपाने बुधवारी संकटच ओढवलं. मंगळवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने बुधवारी मध्यरात्री रौद्रावतार धारण केला. सिंहगड, धनकवडी, सहकारनगर, कात्रज या भागातील सोसायट्या आणि घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. तर मनुष्यहानीसह जनावरंही दगावली आहे. पाण्याच्या वेगात कात्रज भागात पन्नासहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहून गेल्या आहेत. मदतकार्य मोहिमेदरम्यान एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाला आणखी सिंहगड परिसर आणि सहकार नगरात दोन मृतदेह सापडले होते. त्यानंतर मृतांचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यात पावसामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यु झाला आहे. दरम्यान, जळगावमध्येही वीज पडून पाच जण मरण पावले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 26th Sep 2019 रोजी प्रकाशित
पुण्यात पावसामुळे हाहाकार; 12 जणांचा मृत्यू
मनुष्यहानीसह जनावरंही दगावली
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 26-09-2019 at 08:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live updates heavy rains lash pune electricity cut off effect on water supply bmh
Highlights
पुणे शहरातील दांडेकर पुल परिसरातील घरांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. बुधवारी मध्यरात्री घरांमध्ये पाणी साचले होते. गुरूवारी दुपारनंतर पाणी ओसरण्यास सुरूवात झाली. पाणी कमी होत चालले असले तरी घरांमध्ये चिखल झाला आहे.
बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे झालेल्या हानीची माहिती आता हळूहळू समोर येत आहेत. पावसामुळे पुण्यात प्रचंड वित्त आणि जीवित हानी झाली आहे. याबरोबर पुण्यातील वेगवेगळ्या भागात एक हजाराहून अधिक जनावरे दगावली आहेत. एकट्या सहकार नगरातील श्री दुग्धालय डेअरीतील शंभर जनावरे मरण पावली आहेत. यात 25 गाईसह म्हशींचाही समावेश आहे.
कोंढवा येथे बुधवारी रात्री धर्मनाथ कुमार भारती ही व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने धर्मनाथ हे वाहून गेले. ते अद्याप बेपत्ता आहेत.
जळगाव जिल्ह्यामध्ये वीज पडून पाच जण मरण पावल्याची घटना समोर आली आहे. मृतांपैकी चार जण एकाच कुटुंबातील आहे. सगळे जण शेतात ज्वारीची पेरणीचे काम करीत होते. अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतातील झोपडीत आसरा घेतला. मात्र, याचवेळी झोपडीवर वीज कोसळली. एकाचवेळी पाच जणांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
पुण्यातील वानवडी भागातील वानवडी स्मशानभूमीजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. याबरोबरच पुण्यातील पावसामुळे गेलेला बळींचा आकडा बारा झाला आहे. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.
रात्रभर पुणे शहराला वेठीस धरणाऱ्या पावसाने विध्वंस घडवला. अवघे शहर कोलमडून पडले. लोक पाण्यात अडकून पडले होते. गुरूवारी सकाळी एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य हाती घेतले होते. पाऊस थांबल्यानंतर मदत कार्याला वेग आला. सकाळीपासून दुपारपर्यंत ठिकठिकाणी पाण्यात अडकलेल्या 10,500 लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
पुण्यात पावसामुळे हाहाकार माजला असून प्रचंड नुकसान झालं आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून लोक अडकले आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अथक प्रयत्न करत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे जिथे अग्निशमन दलाच्या जवानाने जीव धोक्यात घालून १० महिन्याच्या बाळाला जीवनदान दिलं आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.
मुसळधार पावसाने पुणे शहराला तडाखा दिला. बुधवारी रात्रभर पावसाचं तांडव पुण्यात सुरू होतं. सकाळी पाऊस थांबला. मात्र, सर्वत्र हाहाकार उडाला होता. अशाच परिस्थिती पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीसाठी दिल्लीत गेले आहेत. यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी टीका केली आहे. "सांगली, कोल्हापूर, साताऱ्यानंतर राज्य सरकार पुण्याकडेही दुर्लक्ष करत आहे," असं भूजबळ यांनी म्हटलं आहे.
पुण्याबरोबरच नाशिक शहर परिसरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. मुंबई-नाशिक लोहमार्गादरम्यान अस्वली, पाडली आणि घोटी स्थानकांजवळ पावसाचे पाणी रेल्वे रुळावर आल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. गाड्या खोळंबल्याने मुंबईहून-नाशिकला जाणाऱ्या गाड्यामधील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
मंगळवारी पुण्यात दाखल झालेला पाऊस महिनाअखेरपर्यंत मुक्कामी राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने तसा अंदाज व्यक्त केला आहे. पुणे शहर आणि परिसरात 27, 28 सप्टेंबरलाही गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुण्यात पाच दिवस 51 ते 75 टक्के पाऊस बरसणार असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे.
नाशिक शहरासह इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्येही मुसळधार पाऊस झाला. अस्वली पाडली आणि घोटी स्थानकांदरम्यान रूळावर मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने मुंबईकडून नाशिकला जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
पुणे आणि परिसरात पावसामुळे 11 जणांचा मृत्यु झाला आहे. बचाव मोहिमेदरम्यान सापडले असून, यातील 8 मृतदेह पुणे शहर परिसरात सापडले आहेत. तर 3 मृतदेह खेड-शिवपूरमध्ये सापडले आहे. दुष्काळग्रस्त अशी ओळख असलेल्या खेड-शिवपूरमध्येही मुसळधार पाऊस होत आहे.
बुधवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर पुणे शहरातील विविध भागात नागरी वसाहतींमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे अनेक नागरिक अडकून पडले होते. अडकलेल्या 14 हजार नागरिकांना गुरूवारी सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, सुखरूप ठिकाणी हलवण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांनी ही कामगिरी केली.
आतापर्यंत बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील 224 कुटुंब आणि 602 जनावरांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. आंबी बुद्रुक, मोरगाव, तरडोली, जळगाव सुपे, अंजनगाव, करावागज, डोर्लेवाडी, सोनगाव या भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. तर जेजुरी - सासवड मार्गावरील पूल तुटल्याने पुण्याहून जेजुरीकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे.
पुण्यापाठोपाठ बारामती तालुक्यातही पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. नाझरे धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाझरे धरण तुंडूंब भरले आहे. धरणातून तब्बल 85 हजार क्युसेक वेगाने विसर्ग केला जात असून, कऱ्हा नदीला पूर आला आहे. कऱ्हा काठावरील नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे. मात्र, गावांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही माहिती दिली आहे. "नाझरे धरण बांधल्यापासून पहिल्यांदाच इतकं भरलं असल्याचं बोललं जात आहे. सध्या बारामती आणि परिसरातील पाऊस थांबला असला तरी, परिस्थती पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागेल. नागरिकांना मदत करण्याचे काम केलं जात आहे," असं पवार म्हणाले.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे आणि बारामतीतील परिस्थितीची माहिती दिली आहे. "राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि नियंत्रण कक्ष सर्व स्थितीवर लक्ष ठेवून आहे. एनडीआरएफच्या चार तुकड्याद्वारे पुण्यात मदतकार्य सुरू आहे. तर एक तुकडी बुधवारी रात्रीच बारामतीला पाठवण्यात आली आहे. बारामतीतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे," अशी माहिती पाटील यांनी दिली.
पावसामुळे पुण्यातील सिंहगड, कात्रज, अरण्येश्वर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक या बचाव कार्यावर नजर ठेवून आहेत. दरम्यान, त्यांनी काळजी करू नका, असा दिलासा नागरिकांना दिला आहे. महापौर टिळक म्हणाल्या, "पुणे शहर परिसरात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे, तरी कृपया नागरिकांनी काळजी करू नये. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. याचबरोबर कोणालाही कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास माझ्याशी संपर्क करावा," असं आवाहन टिळक यांनी केलं आहे.
भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांना प्राण गमवावे लागले. घटनेतील मृतांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. 'पुणे आणि परिसरात पावसामुळे झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले आहे. माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. मदत पोहोचवण्यासाठी सरकार सर्वोतोपरी मदत करीत आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि नियंत्रण कक्ष पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. एनडीआरएफच्या दोन तुकड्या पुण्यात, तर दोन तुकड्या बारामतीत तैनात करण्यात आल्या आहेत. आणखी एक तुकडी बारामतीकडे रवाना झाली आहे. धरणातून सुरू असलेल्या विसर्गावर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे,' असे फडणवीस यांनी ट्विट करून सांगितले.
पुण्यातील उद्भवलेल्या पूरसदृश्य परिस्थितीनंतर अग्निशमन दलाबरोबर एनडीआरएफच्या तीन तुकड्यांनी मदतकार्य सुरू केलं आहे. पुणे आणि कात्रज जवळ प्रत्येकी एक तर बारामती आणि महापालिका कार्यालयाजवळ तैनात करण्यात आली आहे. आंबील नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाने घराची भिंत कोसळल्यानंतर एनडीआरएफला पाचारण करण्यात आले होते.
पुण्यातील पावसामुळे झालेल्या स्थितीवर राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांंत पाटील नजर ठेवून आहेत. "पावसाचा जोर वाढल्यानंतर रात्री साडेदहा वाजेपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. पुण्यात झालेला पाऊस हे अचानक आलेलं संकट आहे. गेल्या बारा वर्षातील हा सर्वाधिक पाऊस असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने मदत कार्य सुरू केले आहे. पाऊस वाढल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला असावा," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
बुधवारी रात्री झालेल्या पावसाने सात जणांचे बळी घेतले आहे. अरण्येश्वर परिसरात आंबील नाल्याचे पाणी घरात शिरून भिंत कोसळली. पाच जण मरण पावले आहेत. त्यांचे मृतदेह सापडले असून ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, गुरूवारी सकाळी एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाने मदत कार्य सुरू केल्यानंतर आणखी दोन मृतदेह सापडले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ७ वर पोहोचला आहे. यात रोहित भरत आमले (वय 13), संतोष कदम (वय 55), श्रीतेज सदावर (वय 9), जान्हवी जगन्नाथ सदावर (वय 35), दत्तात्रय गिरमे (वय 55) यांच्यासह आतापर्यंत सात जण मरण पावले आहेत.
पुण्याबरोबरच बारामती आणि पुरंदर परिसरातही मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे नाझरे धरणातून 50 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कऱ्हा नदीला पूर आला आहे. प्रशासनाने पाणी सोडण्यापूर्वी मध्यरात्री तीनच्या सुमारास नदीकाठावरील गावांतील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. प्रशासनाने गावागावांत माईकवरून सूचना जारी करून नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला. पंधरा वीस वर्षांनंतर कऱ्हा नदीला पूर आला आहे.
पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. अरण्येश्वरमध्ये नाल्याच्या पुरामुळे घरांची भिंत कोळल्याची घटना घडली होती. दुसरीकडे कात्रज पुलाखाली उभ्या करण्यात आलेल्या पन्नासहून अधिक वाहने वाहून गेली आहेत. यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
पुण्यात झालेल्या पावसाने घरांसह वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र, जीवितहानीचे आकडे आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. एनडीआरएफच्या पथकाला सिंहगड परिसरात असलेल्या कॅनॉलजवळ एका कारमध्ये एक मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. तर सहकार नगर येथेही एक मृतदेह सापडला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव कार्य हाती घेतल्यानंतर मृतदेह आढळून आला.
पुणे शहर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हाप्रशासनाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे आणि बारामती तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.