पिंपरी-चिंचवडमधील अनेक नागरिकांचा आणि संघटनाचा विरोध असतानाही राज्य सरकारने शुक्रवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांची बदली करण्याचे आदेश दिले. परदेशी यांची पुण्यातच मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागात महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या धडक कारवाईमुळे श्रीकर परदेशी यांना पिंपरी-चिंचवडमधील राजकारण्यांचा मोठा विरोध होता. त्यामुळे त्यांची बदली करण्याची मागणी सातत्याने राज्य सरकारकडे करण्यात येत होती. गेल्या काही दिवसांपासून परदेशी यांच्या बदलीसाठी हालचालींना वेग आला होता. मे २०१२ मध्ये परदेशी पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाले होते. त्यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ५०० अनधिकृत बांधकांमावर पालिकेने हातोडा पाडला होता. सर्वसाधारणपणे तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याअगोदरच परदेशी यांची बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्य सरकारने विविध सनदी अधिकाऱयांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी काढले. पुण्याचे जिल्हाधिकारी राहिलेले विकास देशमुख यांची आता पुणे महापालिकेत आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांची शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. मनिषा म्हैसकर यांची वैद्यकीय शिक्षण आणि औषधे विभागात सचिव म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्याकडे माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे. अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी रुबल आगरवाल यांची, नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी राधाकृष्ण बी यांची, नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी अभिषेक कृष्णा यांची बदली करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2014 रोजी प्रकाशित
… अखेर श्रीकर परदेशी यांची बदली; पुण्याच्या आयुक्तपदी विकास देशमुख
पिंपरी-चिंचवडमधील अनेक नागरिकांचा आणि संघटनाचा विरोध असतानाही राज्य सरकारने शुक्रवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांची बदली करण्याचे आदेश दिले.
First published on: 07-02-2014 at 07:36 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government transfer pcmc commissioner shrikar pardeshi