आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील यांनी शिवसेनेचे राजाराम बाणखेले यांच्यावर ६६ हजार ३५९ मतांनी विजय मिळवला. आश्चर्याची बाब म्हणजे हा त्यांचा सलग सातवा विजय आहे. या विजयासह दिलीप वळसे-पाटील सातव्यांदा आमदार झाले आहे.

दिलीप वळसे-पाटील

त्यांना १ लाख २५ हजार ५७१ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात उभे असलेल्या राजाराम बाणखेले यांना केवळ ५९ हजारा २१२ मतांपर्यंतच मजल मारता आली. राजाराम बाणखेले हे आंबेगाव पंचायत समितीचे अपक्ष सदस्य आहेत. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली होती. आक्रमक प्रचारामुळे ते चर्चेत आले होते. परंतु दिलीप वळसे-पाटील यांच्या करिश्म्यापुढे त्यांचा आक्रमकपणा फोल ठरला. परिणामी त्यांना पराजय पत्करावा लागला. आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. १९९० पासून ते आतापर्यंत दिलीप वळसे पाटील हेच आंबेगावचे आमदार आहेत. येथील सर्व सहकारी संस्थांवर दिलीप वळसे-पाटील यांचे वर्चस्व आहे. आतापर्यंत दिलीप वळसे पाटील यांचा या मतदारसंघात एकदाही पराभव झाला नाही.