मालेगाव स्फोटातील आरोपी समीर कुलकर्णीला आजपासून महाराष्ट्र पोलिसांनी सशस्त्र पोलीस संरक्षण दिलं आहे. उत्तर प्रदेश येथे कमलेश तिवारी प्रकरण घडलं त्यानंतर केंद्र सरकारने ज्यांना सुरक्षा हवी होती त्यांना पोलीस संरक्षण दिलं आहे असे समीर कुलकर्णीने लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितले.

या अगोदर शंकराचार्य, साध्वी आणि कर्नल यांना सुरक्षा मिळाली होती. कर्नल यांना मिलिटरी पोलीस, साध्वी यांना मध्यप्रदेश पोलीस आणि शंकराचार्य यांना युपी पोलिसांचे संरक्षण होते. आमचे जे सरकारी वकील आहेत त्यांना ही पोलीस सुरक्षा होती. अन्य जे आरोपी होते त्यातील मेजर उपाध्याय यांच्यावर उत्तर प्रदेश येथे हल्ला झाला होता.

मे २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. काही महिन्यांपूर्वी मी पोलीस संरक्षणासाठी अर्ज केला होता. अखेर त्यांनी मला सशस्त्र सुरक्षारक्षक दिला आहे. मी जिथे जाईन तिथे तो माझ्यासोबत असेल. मला पोलीस संरक्षण का दिले ते माहिती नाही? पण लखनऊमध्ये कमलेश तिवारी प्रकरण घडल्यामुळे मला पोलीस सुरक्षा दिली असावी असे समीर कुलकर्णी म्हणाले.

मला सुरक्षेचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे राज्य सरकार सुरक्षेच्या खर्चाचा भार उचलेल असे समीर कुलकर्णीने सांगितले. पोलीस संरक्षण देण्यात आलेला कुलकर्णी या प्रकरणातील तिसरा आरोपी आहे. मालेगावमध्ये दुचाकीवर झालेल्या स्फोटात सहाजणांचा मृत्यू झाला होता तर १०० जण जखमी झाले होते. २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोटाची घटना घडली होती.