सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांत तेलुगूला मागे टाकून मराठी तिसरी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी भाषकांसाठी अतिशय आनंदाची माहिती समोर आली आहे. मराठी मातृभाषा असलेल्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे सरकारच्या भाषा अहवालातून स्पष्ट झाले. देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीने तेलुगूला मागे टाकत तिसरे स्थान मिळवले आहे. देशात हिंदी मातृभाषा असलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. तर बंगालीने दुसरे स्थान पटकावले आहे.

२०११च्या जनगणनेच्या माध्यमातून देशभरातील भाषांचा अभ्यास करण्यात आला. त्याचा अहवाल सरकारकडून नुकताच जाहीर करण्यात आला. हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण २००१ च्या तुलनेत वाढले आहे. २००१ मध्ये हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ४१.०३ टक्के होते. २०११ मध्ये हे प्रमाण ४३.६३ टक्क य़ांवर पोहोचले आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या बंगालीचे प्रमाण ८.१ टक्कय़ांवरून ८.३ टक्कय़ांवर  गेले आहे. मराठी बोलणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. २००१ मध्ये मराठी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ६.९९ टक्के होते. २०११ मध्ये हे प्रमाण ७.०९ टक्कय़ांवर पोहोचले. या पूर्वी तिसऱ्या स्थानी तेलुगू भाषा होती. तेलुगू बोलणाऱ्यांचे प्रमाण ७. १९ टक्कय़ांवरून कमी होत ६.९३ टक्के झाल्याने मराठीने तेलुगूला मागे टाकत तृतीय स्थान मिळवले. या यादीत गुजराती भाषा सहाव्या आणि उर्दू सातव्या स्थानी आहे. सूचिबाह्य़ भाषांमध्ये २.६ लाख लोकांनी त्यांची इंग्रजी ही पहिली बोलीभाषा असल्याचे सांगितले. त्यातील १.६ लाख लोक महाराष्ट्रातील आहेत, असे या अहवालात नमूद केले आहे.

भाषेविषयीची माहिती संकलित करण्यासाठी जनगणना हा सर्वात मोठा स्रोत आहे. या अभ्यासामुळे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना निश्चित ध्येय समोर ठेवून काम करण्यासाठी मदत होणार आहे. देशातील भाषिक सद्य:स्थिती अद्ययावत करण्यासाठी हा अहवाल महत्त्वाचा आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi language