स्मृतिभ्रंशाची गंभीरता रोखण्यासाठी ध्यानधारणा गुणकारी ; भारतीय मेंदूविकारतज्ज्ञांच्या संशोधनातील निष्कर्ष

स्मृतिभ्रंशाच्या आजाराचे (अल्झायमरचे) निदान लवकर झाल्यास त्याची वाढ रोखण्यासाठी ध्यानधारणा (मेडिटेशन) हा उपयुक्त पर्याय असल्याचे मेंदूविकारतज्ज्ञांच्या संशोधनातून समोर आले आहे.

पुणे : स्मृतिभ्रंशाच्या आजाराचे (अल्झायमरचे) निदान लवकर झाल्यास त्याची वाढ रोखण्यासाठी ध्यानधारणा (मेडिटेशन) हा उपयुक्त पर्याय असल्याचे मेंदूविकारतज्ज्ञांच्या संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे विस्मरणासारख्या आजारांची सुरुवात असलेल्या नागरिकांना ध्यानधारणेला आपल्या दैनंदिन वेळापत्रकात स्थान द्यावे, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सत्यम उपक्रमांतर्गत कोलकाता येथील अपोलो रुग्णालयाचे मेंदूविकार विभागाचे प्रमुख डॉ. अमिताभ घोष यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. स्मृतिभ्रंशाच्या प्राथमिक टप्प्यात किंवा विस्मरण होते आहे, अशी शंका आल्यास दररोज किमान ३० मिनिटे केलेले मेडिटेशन रुग्णांच्या मेंदूतील स्मृतिभ्रंश वाढवणारे बदल (स्ट्रक्चरल चेंजेस) संथ करण्यात यशस्वी ठरल्याचे डॉ. घोष यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. डॉ. घोष म्हणाले, स्मृतिभ्रंशाचा आजार हा कधीही न बरा होणारा आजार आहे. त्यामुळे त्याच्या वाढीचा वेग संथ करणे एवढेच सध्या वैद्यकशास्त्राच्या हाती आहे. मेंदूशी संबंधित विकारांवर योगासने, नृत्य, कला अशा अनेक गोष्टींचा सहायक उपचार पद्धती म्हणून वापर केला जातो. त्याच प्रकारे मेडिटेशनचे परिणाम अभ्यासण्यासाठी हे संशोधन हाती घेण्यात आले. या संशोधनाला अधिकाधिक अचूक करण्यासाठी स्मृतिभ्रंशाची सुरुवात झालेले मेडिटेशन करणारे आणि न करणारे अशा दोन गटांतील रुग्णांच्या नियमित चाचण्या (एमआरआय) करून मेंदूतील बदलांचा तौलनिक अभ्यास केला. त्यातून स्मृतिभ्रंशाच्या वाढीला कारणीभूत ठरणाऱ्या ग्रे एरियाची वाढ रोखण्यात मेडिटेशनने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसून आले आहे. या संशोधनाची दखल ‘फ्रंटियर्स इन ह्युमन न्यूरोसायन्स’ या वैद्यकीय नियतकालिकाकडून घेण्यात आली आहे.

स्मृतिभ्रंशाची लक्षणे दिसल्यानंतर निदान होईपर्यंत बराच वेळ जातो. ५०-६० वर्षे या व्यक्तिगत, व्यावसायिक प्रगतीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर स्मृतिभ्रंशाची लक्षणे दिसल्याने अनेकांचे नुकसान होते. त्यामुळेच त्याची वाढ रोखण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. या संशोधनासाठी निवडण्यात आलेल्या रुग्णांना विस्मरणाचे नुकतेच निदान झाले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये ध्यानधारणेचे उत्तम परिणाम दिसून आले. जीवनशैलीतील बदल हा आज सर्व आजारांचे मूळ ठरत आहे. नकारात्मक विचार, नैराश्य, ताणतणाव या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठीही ध्यानधारणेचा उपयोग होतो.

डॉ. अमिताभ घोष, अपोलो रुग्णालय (कोलकाता), मेंदूविकार विभाग प्रमुख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Meditation effective severity dementia ysh

Next Story
लोहगाव विमानतळावर उतरणाऱ्यांना आरटीपीसीआर बंधनकारक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी