वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी अर्ज भरणे किंवा वाहन चालविण्याची चाचणी देण्याची वेळ आरक्षित करण्यासाठी ऑनलाईन यंत्रणेतून जावे लागत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असतानाच ऑनलाईन यंत्रणेत बनवेगिरीचा ‘व्हायरस’ शिरल्याने समस्येत आणखी भर पडली आहे. बनावट नावे वापरून किंवा एकाच नावाने अनेक अर्ज भरून वाहन चालविण्याची चाचणी देण्याच्या वेळा आरक्षित केल्या जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने या बनवेगिरीविरोधात थेट पोलिसांकडे तक्रार देण्यात येत असून, त्यानुसार आठजणांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
शिकाऊ व पक्का वाहन परवाना काढण्यासाठी अर्ज करण्याबरोबरच वाहन चालविण्याची चाचणी देण्यासाठी दीड वर्षांपासून ऑनलाईन यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे. पुणे व िपपरी-चिंचवडमध्ये वाहन परवाना मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुणे शहरात दिवसाला साडेचारशेहून अधिक जणांना चारचाकी वाहनांचा शिकाऊ परवाना दिला जातो. मात्र, पक्का परवाना काढताना वाहन चालविण्याची चाचणी एका दिवसात केवळ १३० जणांनाच देता येते. चाचणीची वेळही ऑनलाईन पद्धतीनेच घ्यावी लागते. चाचणी मार्गाची क्षमता कमी असल्याने अनेकांना पक्का परवाना मिळविण्यासाठी पाच ते सहा महिने थांबावे लागते.
ऑनलाईन यंत्रणेतील या समस्या सुरू असतानाच परवाना मिळविण्यासाठी बनावट नावाने अर्ज भरण्याचे प्रकार काही जणांकडून केले जात आहेत. त्याचप्रमाणे एकाच नावाने एकापेक्षा अधिक अर्ज भरून चाचणीसाठी वेगवेगळ्या वेळा घेण्याचे प्रकारही होत आहेत. या प्रकारांमुळे चाचणी देणाऱ्यांच्या संख्येत आपोआपच वाढ दिसून येते व त्यामुळे अनेकदा प्रामाणिकपणे अर्ज भरून चाचणीची वेळ मागणाऱ्यांना ही वेळ मिळू शकत नाही. या प्रकारातून आरटीओची फसवणूकही होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे काही प्रकार उघड झाल्याने आरटीओकडून त्याबाबत थेट पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार आता आठजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ऑनलाईन यंत्रणेतील बनवेगिरीबाबत गुन्हा दाखल होत असल्याने अशा प्रकारांना आळा बसू शकणार असला, तरी हे प्रकार पूर्णपणे थांबलेले नाहीत. त्यामुळे ऑनलाईन यंत्रणेतच तांत्रिक बदल अपेक्षित असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. वाहन परवान्याची वेबसाईट काही दिवसांपूर्वी रात्री बारा वाजता सुरू होत होती. त्यामुळे चाचणीची वेळ घेण्यासाठी नागरिकांना रात्री जागावे लागत होते. ही त्रुटी लक्षात आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून त्यात बदल करण्यात आल्यानंतर ही वेबसाईट आता सकाळी आठ वाजता सुरू होते. याच पद्धतीने एकाच नावाने किंवा बनावट नावाने चाचणीच्या अनेक वेळा आरक्षित होऊ नयेत, यासाठी यंत्रणेतील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2016 रोजी प्रकाशित
वाहन परवान्याच्या ऑनलाईन यंत्रणेत बनवेगिरीचा ‘व्हायरस’
बनावट नावे वापरून किंवा एकाच नावाने अनेक अर्ज भरून वाहन चालविण्याची चाचणी देण्याच्या वेळा आरक्षित केल्या जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 09-04-2016 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mesh in timing for test for driving license