पुण्यातील एका हौशी संग्रहकाने गेल्या तीस वर्षांपासून मोटारींच्या लघु प्रतिकृती जमा केल्या आहेत. त्यात १९२३ सालच्या फोर्ड ट्रकपासून ते सध्याच्या काळातील बीएमडब्ल्यूच्या आकर्षक मोटारींचा समावेश आहे. मर्सडीज बेंझ, हमर, कूपर, फेरारी, जग्वार, ऑडी, महिंद्रा, टाटा, मारूती अशा कंपन्यांच्या मोटारींच्या प्रतिकृती, तर सुझुकी, होंडा, बजाज, डुकाटी अशा विविध कंपन्यांच्या मोटारसायकलींचा समावेश आहे. या संग्रहाची संख्या तब्बल सव्वा दोनशेवर पोहोचली असून, आता या प्रतिकृती संग्रहालयाच्या प्रतीक्षेत आहेत.
पर्वती येथे राहणाऱ्या रत्नाकर जोशी यांचा हा संग्रह. त्यांनी १९८६ सालापासून या प्रतिकृती जमा करण्यास सुरूवात केली. सुरूवातीला मर्सडीज बेंझ कंपनीची एक प्रतिकृती त्यांना मिळाली. मग अशा प्रतिकृतींचा संग्रह करण्याचा विचार त्यांना सुचला आणि हा संग्रह वाढत गेला. तो इतका वाढला की त्यांच्या संग्रहात आता परदेशी बनावटीच्या १७५, तर भारतीय बनावटीच्या ५० प्रतिकृतींचा समावेश आहे. त्यात मोटारी, मोटारसायकली, ट्रॅक्टर, टॅक्सी, बस अशा वेगवेगळय़ा वाहनांच्या प्रतिकृती आहेत. महाराष्ट्रातील एका कलाकाराने त्यांना बैलगाडीची प्रतिकृती भेट दिल्यामुळे तिचाही त्यात समावेश झाला आहे.
याबाबत जोशी यांनी सांगितले की, या प्रतिकृतींची शाळा, सोसायटय़ा, सामाजिक संस्थांच्या मदतीने प्रदर्शने भरवण्यात आली आहेत. त्याद्वारे विद्यार्थ्यांना या वाहनांची आणि वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्याचा प्रयत्न असतो. ही प्रदर्शने मुलांना खूप आवडतात. आता या प्रतिकृतींचे कायमस्वरूपी संग्रहालय उभे करण्याचा विचार आहे. त्यासाठी इच्छुक लोकांनी हातभार लावावा. त्यासाठी ९४०३३५४६११ किंवा ०२०-२४२१२७२७ या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.