पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरती परीक्षांची माहिती उमेदवारांना आता अधिक सुलभतेने मिळू शकणार आहे. एमपीएससीने आता मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले असून, विविध भरती प्रक्रिया, परीक्षा आदींबाबतची माहिती उमेदवारांना त्याद्वारे मिळू शकेल. येत्या काळात अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरण्याची सुविधाही ॲपद्वारे उपलब्ध होऊ शकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमपीएससीद्वारे होणाऱ्या स्पर्धा परीक्षा राज्यातील लाखो उमेदवार देतात. विविध पदांच्या जाहिराती, परीक्षा, अर्ज प्रक्रिया या संदर्भातील माहिती एमपीएससीच्या संकेतस्थळावरून दिली जाते. अलीकडेच एमपीएससीकडून ट्विटरसारख्या समाजमाध्यमाचा वापर सुरू करण्यात आला आहे. मात्र स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने उमेदवारांना सुलभतेने माहिती देण्यासाठी ‘एमपीएससी’ या स्वतंत्र मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या अँड्रॉईड प्रणालीसाठीचे ॲप विकसित करण्यात आले आहे, तर आयओएस प्रणालीसाठीचेही ॲप विकसित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एमपीएससीकडून देण्यात आली.

एमपीएससीचे सहसचिव सुनील अवताडे म्हणाले, प्रगत तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून उमेदवारांना अधिकाधिक सुविधा देण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. उमेदवारांना सध्या अर्ज करण्यासाठी एमपीएससीच्या संकेतस्थळाचा वापर करावा लागतो. त्यामुळे उमेदवाराकडे संगणक किंवा लॅपटॉप नसल्यास सायबर कॅफेत जावे लागते. मात्र आता ॲपद्वारे उमेदवारांना त्यांच्या मोबाईलवरच सर्व माहिती मिळेल. येत्या काळात अ‍ॅपद्वारेच अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरण्याची सुविधा देण्यात येणार आहे.

ॲप स्वागतार्ह, पण उमेदवारांना उत्तर मिळावं
तंत्रज्ञानाचा उपयोग करून एमपीएससी उमेदवारांना सुविधा देत आहे, कामकाजात सुधारणा करत आहे हे स्वागतार्ह आहे. पण उमेदवारांनी पाठवलेल्या ई मेलला उत्तर दिले जात नाही, कॉल सेंटरकडून व्यवस्थितपणे माहिती दिली जात नाही. एमपीएससीने याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. तसेच ॲपअंतर्गत उमेदवारांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती उमेदवारांना मिळायला हवी. कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची सुविधाही असावी असे उमेदवारांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc developed mobile application to give latest updates about competitive exams pune print news rmm