यंत्रणांकडून स्वच्छतेचे काम संथगतीने; अरण्येश्वर भागात सर्वाधिक समस्या
शहरात मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर आंबील ओढय़ाला आलेल्या पुरामुळे हाहाकार उडाला. पाण्याच्या लोंढय़ाने सामान्यांचे बळी घेतले तसेच अनेकांचे संसार रस्त्यावर आले. घरात चिखल, राडारोडा आल्यानंतर शुक्रवारी दिवसभर दक्षिण पुण्यातील अनेक वसाहती, बंगल्यांमध्ये साफसफाईचे काम सुरू होते. रस्त्यावर आलेला कचरा आणि राडारोडय़ामुळे अस्वच्छता निर्माण झालेली असतानाच रस्ता आणि वसाहतींच्या आवारात आलेला कचरा हटविण्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.
शहरात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर कात्रज भागातून येणाऱ्या आंबील ओढय़ाला पूर आला. पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता. त्यामुळे आंबील ओढय़ाची संरक्षक भिंत फुटली आणि पाण्याचा लोट लोकवस्तीत शिरला. दक्षिण पुण्यातील बिबवेवाडी, पद्मावती, कात्रज भागातील लेकटाऊन सोसायटी, पद्मावती भागातील गुरुराज सोसायटी, अरण्येश्वर भागातील टांगेवाला वसाहत, मित्रमंडळ चौक, आंबील ओढा वसाहतीत पाणी शिरले. पाण्याच्या रेटय़ामुळे टांगेवाला वसाहतीत एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. ओढय़ातून वाहून आलेला राडारोडा, कचरा वाहून सोसायटय़ांचे आवार, घरे तसेच रस्त्यावर आला.
अरण्येश्वर भागातील संतनगर ते पद्मावती दरम्यानचा पूल तसेच गजानन महाराज मंदिर चौकातून अरण्येश्वर चौकाच्या दिशेने जाणारा पूल पाण्याखाली गेला.
आंबील ओढय़ातून प्रचंड प्रमाणात वाहून आलेला राडारोडा बुधवारी पद्मावती, अरण्येश्वर भागातील अनेक ठिकाणी कायम असल्याचे शुक्रवारी आढळून आले. सर्वत्र चिखल, राडारोडा काढताना महापालिकेचे सफाई कामगार पाहायला मिळाले. मात्र, तीस तासांनंतर या भागातील कचरा अतिशय संथगतीने काढण्याचे काम सुरू असल्याच्या तक्रारी या भागातील रहिवाशांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केल्या.
या भागातील कचरा, राडारोडा हटविण्याचे काम करण्यासाठी महापालिकेने अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची गरज होती. जेसीबी आणि पोकलेनसारख्या यंत्राचा वापर करून कचरा, राडारोडा युद्धपातळीवर हटविण्याचे काम व्हायला हवे होते. मात्र, महापालिकेकडून या यंत्रणेचा वापर करण्यात आला नाही, अशी तक्रार करण्यात आली.
नवरात्रीत अस्वच्छता
नवरात्रोत्सवाचा प्रारंभ रविवारी (२९ सप्टेंबर ) होत आहे. नवरात्रोत्सवाच्या अगोदर चार ते पाच दिवस महिलांकडून घराची स्वच्छता केली जाते. मात्र, बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आणि कचरा, राडारोडा हटविण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागणार असल्याचे महिलांनी सांगितले.
दुचाकी घसरण्याची भीती
राडारोडय़ामुळे दुचाकी घसरून गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याची शक्यता असून राडारोडा आणि कचरा हटविण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत या भागातील नागरिकांनी समाजमाध्यमाद्वारे काही छायाचित्रे प्रशासन तसेच वाहतूक पोलिसांनाही पाठविली आहेत.