गणपतीपुळ्याला जाण्यासाठी आता पुण्याहून दररोज वातानुकूलित ‘मल्टी एक्सेल व्हॉल्वो’ गाडय़ा सुरू करण्यात आल्या आहेत. ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’ने (एमटीडीसी) अशा पाच गाडय़ा खरेदी केल्या असून ‘प्रसन्न पर्पल’ या खासगी कंपनीसह एमटीडीसीने ही सेवा सुरू केली आहे.
एमटीडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वैशाली चव्हाण यांनी ही माहिती दिली. ‘प्रसन्न पर्पल’चे सहल प्रमुख संजय नाईक, सरव्यवस्थापक रवींद्र मोरे या वेळी उपस्थित होते. ‘मल्टी एक्सेल व्हॉल्वो’ गाडय़ांमध्ये वातानुकूलन यंत्रणा, ‘सेमी स्लीपर’ बैठक व्यवस्था याबरोबरच शीतकपाट व स्वच्छतागृह देखील आहे. पुण्यातून या गाडय़ा रोज रात्री ८ वाजता निगडीतून, तर रात्री १० वाजता स्वारगेटहून सुटणार आहेत. पुणे बस स्थानक, कोथरूड, कात्रज आणि औंधच्या प्रवाशांसाठी त्या-त्या भागात या गाडय़ा थांबणार आहेत. या गाडय़ांचे आरक्षण सध्या  http://www.prasannapurple.comया संकेतस्थळावरून करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ०२०- २४४८०६५९, २४४८०२२८ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन एमटीडीसीतर्फे करण्यात आले आहे.