शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यासाठी मुंढवा येथे प्रकल्प उभारण्याच्या कामाला स्थायी समितीने सोमवारी मंजुरी दिली. समितीच्या बैठकीत आयत्यावेळी हा विषय आणण्यात आला आणि तो तातडीने मंजूरही करण्यात आला. या प्रकल्पासाठी ३१ कोटी ६० लाख रुपये इतका खर्च येणार आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेले अनेक महिने हा प्रकल्प मंजुरीअभावी रखडला होता. महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यात झालेल्या करारानुसार पुणे शहरासाठी साडेअकरा टीएमसी पाणी दिले जाते. त्याहून अधिक पाणी शहराला हवे असेल, तर जास्तीत जास्त पाण्यावर महापालिकेने शुद्धीकरणाची प्रक्रिया करावी व ते पाणी शेतीला उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना राज्य शासनाने केली होती. त्यानुसार मुंढवा जॅकवेल प्रकल्पाची आखणी महापालिकेने केली आहे. या प्रकल्पात साडेसहा टीएमसी पाणी प्रक्रिया करून ते शेतीसाठी दिले जाईल.
या प्रक्रियेसाठी मुंढवा येथे जॅकवेल उभारण्याच्या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. गोंडवणा इंजिनिअर्स या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. सहाशे अश्वशक्ती एवढय़ा क्षमतेच्या आठ पंपांसाठी पंप हाऊस बांधणे, पाण्याच्या पुनर्वापराची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारून देणे, ती यंत्रणा कार्यान्वित करून देणे आदी कामांचा त्यात समावेश आहे. त्यासाठीची ३१ कोटी ६० लाखांची सर्वात कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली आहे.
शहरात तयार होणाऱ्या साडेसहा टीएमसी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीच्या पुनर्वापरासाठी साडेसतरानळी येथे मुठा उजवा कालव्यात सोडण्याचे नियोजन आहे. साडेसहा टीएमसी इतके पाणी महापालिकेने प्रक्रिया करून दिल्यानंतर खडकवासला धरणातून आणखी दोन टीएमसी पाणी शहराला पिण्यासाठी दिले जाणार आहे.