सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडण्यासाठी महापालिकेतर्फे उभारल्या जात असलेल्या मुंढवा जॅकवेल प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या प्रकल्पातील आठ मीटर जलवाहिनीचे काम आता बाकी राहिले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून या महिन्याच्या अखेरीस हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल.
मुंढवा जॅकवेल आणि वारजे येथील जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या कामांना महापौर दत्तात्रय धनकवडे आणि आयुक्त कुणाल कुमार यांनी शनिवारी भेट दिली. नगर अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी हेही या वेळी उपस्थित होते. पाटबंधारे विभागाने पुणे शहराला साडेअकरा टीएमसी पाणी मंजूर केले आहे. त्या पेक्षा अधिक पाणी हवे असल्यास नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी उपलब्ध करून दिल्यास तेवढे पाणी शहराला मिळू शकेल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार मुंढवा येथे महापालिकेने प्रक्रिया प्रकल्प उभारला असून त्यातून साडेसहा टीएमसी पाणी शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे पाणी दिल्यानंतर शहराला तेवढा वाढीव साठा पाटबंधारे विभागाकडून मिळणार आहे.
मुंढवा जॅकवेल प्रकल्प शंभर कोटींचा असून तेथे जॅकवेल आणि पंप हाऊस बांधण्यात आले आहे. या कामाला भेट देऊन महापौर आणि आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून मुंढवा जॅकवेल ते साडेसतरानळी दरम्यान साडेतीन किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचे आठ मीटरचे काम बाकी असल्याचे या वेळी सांगण्यात आले. महापालिकेकडून प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे आता पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील प्रक्रिया ठरवली जाणार आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांबरोबर सोमवारी (१४ सप्टेंबर) बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
वारजे जलशुद्धीकरण केंद्राचेही काम अंतिम टप्प्यात आले असून हे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी वारजे येथील कामाची पाहणी केल्यानंतर दिले.