मुळशी तालुक्यातील दखणे गावाजवळ वकील हरिचंद्र निम्हण (वय ५६, रा. कोकाटे आळी, पाषाण) यांचा गुरूवारी रात्री धारदार शस्त्रांनी खून करून त्यांची इनोव्हा मोटार चोरून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पौंड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील सावरगाव येथे अॅड. निम्हण यांची २५ एकर शेती आहे. त्यांच्या शेतात तीन ते चार कुटुंब राहतात. निम्हण हे दररोज त्यांच्या इनोव्हा मोटारीने शेतात जायचे व सायंकाळी यायचे. ते गुरूवारी रात्री अकरा वाजले तरी परत आले नाहीत, त्यांचा फोनही लागत नव्हता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. पौंडकडून कोळवणला जाताना लागणाऱ्या दखणे गावाजवळ रात्री बाराच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या जवळील मोबाईल आणि इनोव्हा मोटार (एमएच १४ बीएक्स ३५३९) ही  चोरीला गेल्याचे आढळून आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पौंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
याप्रकरणी निम्हण यांचा भाचा सचिन शंकर वेडे (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. निम्हण यांची साखरे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आतमध्ये शेती आहे. शेताकडे जाणारा रस्ता हा कच्चा असल्याने चिखल असतो. त्यामुळे ते त्यांची मोटार रस्त्यावर लावून शेतात गेले होते. सायंकाळी शेतातून दूध घेऊन परत येत असताना हल्लेखोरांनी त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केला. त्यांच्याजवळील मोबाईल आणि इनोव्हा मोटार चोरून नेल्याचे दिसून आले, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक एस. डी. परदेशी यांनी दिली. अॅड. निम्हण हे दिवाणी दाव्यात काम करत होते. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक विनायक ढाकणे अधिक तपास करत आहेत.