महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून एका संगणक अभियंत्याचा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला. खून केल्यानंतर या तरुणाचा चेहरा विद्रूप करून मृतदेह ड्रेनेजच्या टाकीत टाकण्यात आला होता. शनिवारी झालेल्या या घटनेनंतर रविवारी या सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
राकेश ज्ञानेश्वर हरगुडे (वय २५, रा. खेसे कॉलनी, लोहगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील ज्ञानेश्वर महादेव हरगुडे यांनी फिर्याद दिली आहे. खुनाच्या आरोपावरून कृष्णा स्वामी (वय २४, रा. गुरुद्वारा कॉलनी, लोहगाव) याला अटक केली असून, त्याचा साथीदार गणेश जगताप याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश हा आयबीएम कंपनीत हार्डवेअर इंजिनिअर म्हणून कामाला होता. कृष्णा व राकेश एकाच भागात राहत असल्याने एकमेकांच्या ओळखीचे होते. लोहगाव येथे राहणाऱ्या एका महिलेशी राकेशचे अनैतिक संबंध होते. ही महिला कृष्णाच्या मित्राची पत्नी असल्याने तिच्याशी संबंध तोडण्यास कृष्णा याने वेळोवेळी राकेशला सांगितले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने राकेशला जिवे मारण्याचे ठरविण्यात आले.
राकेशला कलवड येथील एका मोकळ्या मैदानात आरोपींनी बोलावून घेतले. तेथे त्याच्यावर शस्त्रांनी वार करण्यात आले. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा मृतदेह दीड किलोमीटर अंतरावरील ड्रेनेजमध्ये टाकून देण्यात आला. कलवड येथील मोकळ्या जागेत दुसऱ्या दिवशी सकाळी रक्ताचे डाग दिसून आल्याने याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला. राकेशच्या वडिलांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. घटनास्थळावरील वस्तू वडिलांना दाखविल्यानंतर ओळख पटली. कृष्णा यानेच राकेशला धमकी दिली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.