राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड-मोहननगर येथील नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या खूनप्रकरणातील खरे सूत्रधार उघड केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. माथाडी कामगार नेता व कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण याच्या खुनाचा सूड घेण्यासाठीच टेकवडेचा ‘गेम’ झाल्याची व त्यासाठी मोठी रक्कम मोजण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
तीन सप्टेंबरला मोहननगर येथील राहत्या घराजवळ नगरसेवक टेकवडेचा खून झाला. याप्रकरणी अमोल वहिले यासह चार जणांना पोलिसांनी अटक केली. पूर्ववैमनस्यातून आपणच टेकवडेचा खून केल्याची कबुली तेव्हा आरोपींनी दिली होती. तथापि, यामागील खरा सूत्रधार वेगळाच असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार, पोलिसांनी सखोल तपास केला असता नाटय़मय कलाटणी मिळाली. याप्रकरणी चार आरोपींना मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. रमेश लक्ष्मण चव्हाण (वय-३५, रा. चिखली), बाबू उर्फ सूर्योदय शेखर शेट्टी (वय-३५, रा. चिंचवड स्टेशन), इंद्रास युवराज पाटील (वय-३८, रा. चिखली), आकाश अनिल पोटघन (वय-२०, रा. मोहननगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. डिसेंबर २०१४ मध्ये प्रकाश चव्हाणचा खून झाला. रमेश चव्हाण हा प्रकाशचा भाऊ आहे, तर इंद्रास पाटील हा त्याच्या माथाडी संघटनेचे काम पाहत होता. प्रकाश चव्हाणच्या खुनातील आरोपींना टेकवडे मदत करतो, असा संशय आरोपींना होता, त्यातून पुढे टेकवडेचा काटा काढण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
—
पिंपरी पालिकेतील एक अपक्ष नगरसेवक आणि एका माजी नगरसेवकाने जिवाला धोका असल्याचे कारण सांगत पोलीस संरक्षण मागितले आहे. दोघांचाही गुन्हेगारी वर्तुळात वावर आहे. अविनाश टेकवडेचा निकटवर्तीय असलेला हा नगरसेवक सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या जवळचा आहे. तर, मूळ राष्ट्रवादीचा असलेला माजी नगरसेवक सध्या भाजप नेत्यांच्या वर्तुळात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2015 रोजी प्रकाशित
प्रकाश चव्हाणच्या खुनाचा सूड म्हणून नगरसेवक अविनाश टेकवडेचा ‘गेम’?
माथाडी कामगार नेता व कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण याच्या खुनाचा सूड घेण्यासाठीच.....

First published on: 19-11-2015 at 03:11 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder revenge avinash tekavade crime